लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी (गडचिरोली) : खांदला ते चिरेपल्ली आणि पुढे आलापल्लीला जोडणाऱ्या २२ किलोमीटरच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात महिनाभर आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. बुधवारी (दि. १८) पत्तीगाव, चिरेपल्ली, मरनेली आणि कोत्तागूडम येथील शेकडो ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून मुरूम व गिट्टी खरेदी केली आणि श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती सुरळीत झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी मार्ग नसल्याने खराब जंगलाच्या पायवाटेने पावसाळ्यात चिखलातून नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, गरोदर महिला तसेच रुग्णांना याच रस्त्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊन तसेच आंदोलन करूनही रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
महिनाभरापूर्वी आंदोलन करूनही कार्यवाही नाही..
रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महिनाभर आंदोलन केले. प्रशासनाने रस्त्याच्या प्रश्नावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही. कार्यवाहीचा अहवाल किंवा ठोस निर्णय मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली. अखेर शासनाच्या मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी स्वतःच रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा निर्णय घेतला.
लोकवर्गणीसह श्रमदानातून खड्डे बुजविले…
बुधवारी सकाळपासून पत्तीगाव, चिरेपल्ली, मरनेली आणि कोत्तागूडम येथील महिला, पुरुष आणि तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून मुरूम आणि गिट्टी आणली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने साहित्य रस्त्यावर टाकून नागरिकांनी स्वतः श्रमदान करत खड्डे बुजविले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असली, तरी ही दुरुस्ती तात्पुरतीच असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
कायमस्वरूपी रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा..
तात्पुरत्या दुरुस्तीमुळे सध्या वाहतुकीची अडचण काही प्रमाणात दूर झाली असली, तरी पावसाळ्यात पुन्हा रस्ता खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या २२ किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला तातडीने मंजुरी देऊन कायमस्वरूपी रस्ता तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“आम्ही महिनाभर आंदोलन केले. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेवटी गावकऱ्यांनी स्वतः पैसे जमा करून आणि श्रमदानातून रस्ता तात्पुरता दुरुस्त केला. शासनाने आता या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी रस्ता मंजूर करावा. अन्यथा लवकरच गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी आमरण उपोषण करणार,”
किरणकुमार मोकाशी सामाजिक कार्यकर्ते,
दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या या श्रमदानामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधातील नाराजी स्पष्ट झाली असून, आता शासन या २२ किलोमीटरच्या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत कोणता निर्णय घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.