लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी (गडचिरोली):
‘हर घर जल’चा गाजावाजा करत ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेची तहान भागवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कोट्यवधींचा निधी ओतून सुरू केलेल्या ‘जलजीवन मिशन’चा चामोर्शी तालुक्यात अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. गट ग्रामपंचायत मारोडा अंतर्गत येणाऱ्या भोगनबोडी हेट्टी आणि भोगनबोडी ३६ या गावांमध्ये लाखो रुपयांचा चुराडा करून पाण्याच्या भव्य टाक्या उभारल्या, घराघरांपर्यंत नळांचे पाईपही पोहोचवले; मात्र योजना पूर्ण झाल्याचा डंका पिटणाऱ्या प्रशासनाच्या नाकावर टिच्चून आज गावातील नळ कोरडे ठणठणीत पडले आहेत. शासनाचा पैसा हडपून केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अनास्थेमुळे आज संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, संतापलेल्या ग्रामस्थांनी आता थेट रान पेटवले आहे.
ग्रामीण जनतेला शुद्ध आणि शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे म्हणून शासनाने तिजोरी खुली केली. मात्र, चामोर्शी तालुक्यातील या दोन्ही गावांत या योजनेची अंमलबजावणी नेमकी जनतेच्या सोयीसाठी झाली की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कोट्यवधींचा खर्च करून पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तूंप्रमाणे उभ्या आहेत आणि घरासमोरील नळ केवळ उपहासात्मक ठरत आहेत. एकाही थेंबाचा पत्ता नसताना कागदोपत्री योजना ‘पूर्ण’ कशी दाखवली गेली? प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची चाचणी न घेताच कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्याचे ‘उदार अंतःकरण’ संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या लाभापोटी दाखवले, याचे उत्तर आता प्रशासनाला द्यावेच लागणार आहे.
या योजनेच्या कामांवर प्रत्यक्ष देखरेख ठेवण्याची घटनात्मक आणि प्रशासकीय जबाबदारी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित अभियंत्यांची होती. तरीही कंत्राटदाराने केलेले निकृष्ट काम, पाईपलाईनची चुकीची जोडणी आणि पाण्याच्या मुख्य स्त्रोताचा कोणताही ताळमेळ नसताना कामाची ‘पूर्तता’ कशी मान्य केली गेली? कंत्राटदाराची बिले काढताना कोणत्या निकषांची तपासणी करण्यात आली? हे सर्व प्रश्न या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची आणि टक्केवारीच्या संगनमताची दाट शंका निर्माण करणारे आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्ची पडल्यानंतरही माता-भगिनींना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल, तर ही प्रशासनाच्या संवेदनशीलतेची घोर थट्टा मानली जात आहे.
वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशीची मागणी; आंदोलनाचा इशारा..
भोगनबोडी हेट्टी आणि भोगनबोडी ३६ येथील पाणीपुरवठा योजनेची केवळ कागदी तपासणी न करता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंजूर झालेला एकूण निधी, प्रत्यक्षात जमिनीवर झालेले काम, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता, प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची खरी स्थिती आणि कंत्राटदाराला अदा करण्यात आलेली देयके (बिले) यांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कंत्राटदार आणि त्यांना पाठीशी घालणारे भ्रष्ट अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा जलजीवन मिशनच्या या कोरड्या नळांसमोर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.