ज्वेलर्सच्या चेहऱ्यावर मिरची पावडर; दागिने लुटण्याचा डाव २४ तासांत फसला!

गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; जबरी चोरीच्या प्रयत्नातील तिघे जेरबंद, चौथा फरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : दुकान बंद करून सोने-चांदीचे दागिने घेऊन घरी निघालेल्या ज्वेलर्सला रस्त्यात अडवून त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकत दागिने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना जेरबंद केले असून, टोळीतील चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

ही घटना ३१ ऑगस्टच्या रात्री गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील जंगल सोसायटी कार्यालयाजवळ घडली. गडचिरोली येथील ऐश्वर्या ज्वेलरी शॉपचे मालक सुरेश बाबूराव भोजापूरे हे रात्री दुकान बंद करून मोटारसायकलने घरी जात होते. त्यांच्याकडे सोने-चांदीचे दागिने होते.

जंगल सोसायटी कार्यालयासमोर पोहोचताच मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी भोजापूरे यांना जबरदस्तीने अडविले. अचानक त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकण्यात आली. त्यानंतर दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर जवळील डब्याने मारहाण करण्यात आली. मात्र, भोजापूरे यांनी आरडाओरड केल्याने आरोपींचा डाव फसला. अंधाराचा फायदा घेत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासाची दिशा निश्चित होताच पोलिसांनी गडचिरोली शहरातील तीन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विशाल घनश्याम देशमुख (३६, रामनगर), राकेश विजय गिरसावळे (३५, कन्नमवार नगर) आणि शहबाज सलाम शेख (३१, विवेकानंद नगर, गडचिरोली) यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्यात आणखी एका साथीदाराचा सहभाग असल्याचे समोर आले. सोनू खांडेकर (२४, विवेकानंद नगर) याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमका कट कसा आखण्यात आला, ज्वेलर्सला लक्ष्य करण्यामागील कारण काय होते आणि या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी करून गुन्ह्याशी संबंधित अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना जेरबंद करण्यात आल्याने गडचिरोली पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. चोरी, जबरी चोरी आणि लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी स्पष्ट केले.

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहायक पोलीस निरीक्षक कपील आगलावे, पोलीस उपनिरीक्षक सागर रुपवते यांच्यासह पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Gadchiroli jewelry robberygadchiroli police
Comments (0)
Add Comment