लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा नगर पंचायत अंतर्गत करण्यात येणारी शहरातील रखडलेली विकासकामे, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वारंवार ऐकायला मिळणारे ‘निधी उपलब्ध नाही’ हे प्रशासनाचे उत्तर याविरोधात कुरखेडा शहरातील नागरिकांनी शनिवारी अनोख्या आणि लोकशाही मार्गाचा अवलंब केला. कुरखेडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘भिकमांगो आंदोलनात नागरिकांनी बाजारपेठेत फिरून प्रतीकात्मक भीक मागत नगर पंचायतच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
फवारा चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि विविध आस्थापनांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. विकासकामांसाठी निधी नसल्याचे कारण सातत्याने पुढे केले जात असल्याने, “निधीच नसेल तर आम्हीच जमा करून देतो,” असा उपरोधिक संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
या उपक्रमाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदत करत आंदोलनाशी ऐक्य दर्शविले. आंदोलनातून जमा झालेली संपूर्ण रक्कम सोमवारी नगर पंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार असून, ती शहरातील प्रलंबित नागरी कामांसाठी वापरण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
कृती समितीने शहरातील रुग्णवाहिकेची दुरुस्ती, शवविच्छेदनासाठी शीतपेटीची व्यवस्था, अपूर्ण समाजभवन पूर्ण करणे, हनुमान मंदिर परिसरातील वॉटर एटीएम सुरू करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे, शुद्ध पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहे व मूत्रालयांची दुरुस्ती, नाला बांधकाम, वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणी तसेच आठवडी बाजारातील मूलभूत सुविधांची उभारणी यांसह विविध नागरी प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला लक्ष्य करणे नसून, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांकडे त्वरित लक्ष न दिल्यास आगामी काळात आणखी व्यापक लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष दीपक धारगाये, कुंवर लोकेंद्र शहा सय्याम, सचिव ईश्वर ठाकूर यांच्यासह सहजाद हाशमी, नसिर हाशमी, हिरा चौधरी, गणेश चौधरी, हिरा वालदे, रविंद्र साखरे, ताहीर शेख, साहिल सहारे, आसिफ (टोनू) शेख, आकाश उईके, राहुल कोवे आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.