जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची आश्रमशाळेत अचानक धडक…

विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुविधांची पाहणी; त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील खमनचेरू येथील शासकीय आश्रमशाळेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी अचानक भेट देत विद्यार्थ्यांच्या निवास, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या या पाहणीदरम्यान त्यांनी वसतिगृहापासून वर्गखोल्यांपर्यंत प्रत्येक बाब बारकाईने तपासली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार वातावरण मिळते आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केली. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत खाटा पुरेशा आहेत का, खिडक्यांना डास, किटक तसेच इतर जीवजंतूंपासून संरक्षणासाठी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत का, स्वच्छतागृहे आणि परिसराची स्वच्छता नियमित राखली जाते का, यासह सुरक्षिततेशी संबंधित विविध बाबी त्यांनी तपासल्या.

पाहणीपुरती मर्यादित न राहता जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर, अतिरिक्त खाटा तसेच अभ्यास आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक बेंचेस उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांनी थेट मांडलेल्या या अडचणींची जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ नोंद घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

आश्रमशाळेच्या इमारतीची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या बांधकामाचे आणि उपलब्ध जागेचे कौतुक केले. मात्र, केवळ चांगली इमारत असणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांना त्यामध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि आवश्यक सुविधांनी युक्त वातावरण मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वसतिगृहासह नागरी सुविधांशी संबंधित आवश्यक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अतिरिक्त सुविधांकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक पाहणीमुळे आश्रमशाळेतील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती प्रशासनाला थेट मिळाली. विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अडचणी केवळ कागदोपत्री न राहता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न या भेटीतून अधोरेखित झाला.

यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील हनुमान मंदिर आणि प्रशांत धाम देवस्थान परिसराला भेट देऊन तेथील विकासकामांचीही पाहणी केली. मंदिर परिसरात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित कामांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, परिसराचा विकास, स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

देवस्थान परिसरातील विकासकामे केवळ कागदावरील नियोजनापुरती न राहता त्यांचा भाविकांना प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी कामांचा दर्जा आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

खमंचेरू आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांची प्रत्यक्ष पाहणी आणि चपराळा प्रशांत धाम परिसरातील विकासकामांचा घेतलेला आढावा यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा हा दौरा केवळ पाहणीपुरता न राहता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला दिशा देणारा ठरला.

Action mood on ashram schoolgadchiroli collectorSuddenly visit khamcheru school visit
Comments (0)
Add Comment