लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील महावितरण विभागाच्या कारभाराबाबत ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वीज बिलाची रक्कम समान येत असून, प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार बिल आकारले जात नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत संबंधित ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात लेखी अर्ज देऊन बिलाची तपासणी करून योग्य मीटर रीडिंगनुसार वीज बिल दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र अर्ज सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे.
दर महिन्याला प्रत्यक्ष वीज वापरात बदल होत असतानाही बिलामध्ये जवळपास समान रक्कम येत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मीटरची स्थिती, प्रत्यक्ष मीटर रीडिंग, मागील वीज वापर आणि बिलाची आकारणी यांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महावितरणच्या अधिकृत बिलामध्ये Current Reading, Previous Reading, Unit, Meter Status आणि Bill Period यांसारखे तपशील दिले जातात. त्यामुळे ग्राहकाच्या मीटरची प्रत्यक्ष तपासणी करून योग्य रीडिंगनुसार बिल दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या तक्रारीची तातडीने दखल घेऊन मीटरची तपासणी करावी, प्रत्यक्ष रीडिंगनुसार बिल निश्चित करावे आणि चुकीची आकारणी झाल्यास आवश्यक ती बिल दुरुस्ती करावी, अशी मागणी संबंधित ग्राहकाकडून करण्यात येत आहे.
महावितरण विभागाकडून या प्रकरणी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे मुलचेरा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.