लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत शिक्षण, क्रीडा, सर्जनशीलता आणि जीवनकौशल्यांचा संगम घडवून आणणारा ‘लॉयड्स समर कॅम्प २०२६’ गडचिरोली जिल्ह्यात उत्साहात पार पडला. लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून तब्बल ४६५ हून अधिक विद्यार्थ्यांना नव्या संधींचे दालन खुले झाले.
हेडरी आणि कोन्सरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध उपक्रमांद्वारे स्वतःमधील सुप्त गुणांना वाव दिला. हेडरी येथे ५ ते १४ जूनदरम्यान झालेल्या शिबिरात २६५ विद्यार्थी सहभागी झाले, तर कोन्सरी येथे ६ ते १२ जूनदरम्यान पार पडलेल्या शिबिरात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दहा दिवसांच्या या शिबिरात केवळ मनोरंजन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक दिवसाची सुरुवात शारीरिक तंदुरुस्ती वाढविणाऱ्या व्यायामांनी होत होती. त्यानंतर चित्रकला, हस्तकला, नृत्य, योग, झुंबा, टीम-बिल्डिंग उपक्रम, संवादात्मक शिक्षण सत्रे तसेच विविध इनडोअर आणि आऊटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले.
कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, अॅथलेटिक्स आणि तिरंदाजी यांसारख्या खेळांचे विशेष प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच क्रीडा दुखापत व्यवस्थापन, अग्निसुरक्षा, प्रथमोपचार, सीपीआर, तसेच ‘गुड टच-बॅड टच’ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक जीवनरक्षक आणि सुरक्षाविषयक कौशल्ये आत्मसात करता आली.
संवादकौशल्य, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी, संघभावना आणि शिस्त यांवर आधारित विशेष सत्रांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक शिक्षणपद्धती आणि कौशल्याधारित प्रशिक्षणाचा अनुभव देणारे हे शिबिर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेत दररोज पौष्टिक नाश्ता व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दुर्गम गावांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ग्रामप्रतिनिधी, पालक, मान्यवर नागरिक आणि लॉयड्सचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन त्यांच्या सहभागाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “मुलांमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे समाजाच्या आणि गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यात केलेली गुंतवणूक होय. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. मुलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे.”
शिक्षण आणि मनोरंजनाचा सुरेख मेळ घालत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ‘लॉयड्स समर कॅम्प २०२६’ हा उपक्रम गडचिरोलीच्या सामाजिक विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून भावी पिढी सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण घडविण्याच्या दिशेने लॉयड्सची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.