चित्रपट बनण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत प्रभावी लोकव्यवस्थापन व संवाद कौशल्य महत्त्वाची भूमिका बजावतात – चैतन्य ताम्हाणे

२१ व्या पिफ अंतर्गत झालेल्या विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत चैतन्य ताम्हाणे यांचे प्रतिपादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 5 फेब्रुवारी:-  चित्रपटाच्या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी या केवळ लोकव्यवस्थापन आणि संवाद यांच्या अभावामुळे होत असल्याचे लक्षात घेत मी नेहमीच प्रभावी लोकव्यवस्थापन आणि संवाद कौशल्य यांवर भर देत काम करत आलो आहे. याबरोबरच पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागची प्रत्येक व्यक्ती देखील महत्त्वाची असते हे मला उमगले असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी आज उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ताम्हाणे बोलत होते. ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावर आजवर विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत सर्वांत कमी वयाचे व्याख्याते असलेल्या ताम्हाणे यांनी उपस्थितांशी यावेळी दिलखुलास संवाद साधला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्वाचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी यावेळी उपस्थित होते.

एक दिग्दर्शक म्हणून मी पाहत असलेली गोष्ट कॅमेऱ्यात उतरवायची असेल तर माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला माझ्या मनातील तीच गोष्ट समजली आहे का, याची खात्री मला असायला हवी असे सांगत ताम्हाणे पुढे म्हणाले की, “अशा वेळी चित्रपटाच्या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्ती एकाच ‘पेज’वर असणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा चित्रपट असतो मात्र दिग्दर्शकाच्या मनातील चित्रपट कॅमेऱ्यात उतरायला टीममधील प्रत्येकाची मदत आवश्यक आहे आणि म्हणूनच दिग्दर्शकाचे प्रभावी लोकव्यवस्थापन व संवाद कौशल्य यासाठी गरजेचे आहे.”

चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत वेगवेगळ्या स्वभावाचे अनेक जण सहभागी असतात त्या प्रत्येकाच्या स्वभावानुसार दिग्दर्शकाला त्यांना सांभाळून घ्यावे लागते. शिवाय दिग्दर्शकाच्या अंतर्मनातील भावना आणि निर्णयांकडे देखील दिग्दर्शकाने काना डोळा करता कामा नये.” या सर्व गोष्टी मला माझ्या आजवरच्या प्रवासात उपयुक्त ठरल्या असेही ताम्हाणे यांनी नमूद केले.

चित्रपटाची कथा, संकल्पना, संहिता लेखन, निर्मिती प्रक्रिया या गोष्टी सुरु असतात मात्र त्या योग्य पद्धतीने व्हायच्या असतील तर आधीपासूनची काटेकोर तयारी ही खूप महत्त्वाचा भाग आहे. मी प्रत्येक गोष्टीच्या आधी खूप तयारी करतो असे सांगत ताम्हाणे म्हणाले, “टेस्ट टेस्ट टेस्ट… प्रेप प्रेप प्रेप… या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यामुळे सर्व गोष्टी त्या त्या वेळी ठीक झाल्या नाही तरी मी त्या करण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केला याचे समाधान तुम्हाला मिळेल.”

तुमच्या अंतर्मनाच आवाज ऐकत, स्वत:वर विश्वास ठेवत चालत रहा. अनेकदा अनेक लोक तुमचा मार्ग अडवतील, तुम्ही चुकीचे आहात हे सांगतील, अनेक संकटे येतील पण स्वत:वर विश्वास ठेवत पुढे जाणे हे महत्त्वाचे आहे, हे कायम लक्षात ठेवा असा सल्लाही ताम्हाणे यांनी उपस्थितांना दिला. एक फिल्म मेकर म्हणून तुमचा ज्ञानाचा संचय, आवाका वाढवत रहा. यामुळे तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी शिकण्यासाठी उद्युक्त व्हाल असेही ताम्हाणे यांनी आवर्जून सांगितले.

हे पण वाचा :-