लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आरोग्य आणि साहित्याचा अनोखा संगम घडविणारे पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन ९ सप्टेंबर रोजी बल्लारपूर येथील गोंडराजे बल्लाळशहा नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. पंचायत समिती, बल्लारपूर आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत हे संमेलन होत आहे. प्रसिद्ध समाजसेवक, साहित्यिक आणि शोधग्रामचे संस्थापक डॉ. अभय बंग संमेलनाध्यक्ष आहेत. ग्रामीण समाजाच्या आरोग्यविषयक प्रश्नांकडे साहित्यिक दृष्टिकोनातून पाहण्याबरोबरच आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि ग्रामीण रोजगार या विषयांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे. ‘आरोग्य स्वराज्य’ या संकल्पनेवर डॉ. अभय बंग विशेष भाष्य करणार आहेत. आरोग्याच्या प्रश्नांबाबत नागरिक आणि साहित्यिकांची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
संमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते होणार असून पंचायत समिती, बल्लारपूरचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे स्वागताध्यक्ष आहेत. नगराध्यक्षा डॉ. अल्काताई वाढई, तहसीलदार रेणुका कोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा साळवे, डॉ. प्रशिक वाघमारे, डॉ. गजानन मेश्राम, डॉ.संदेश मामीडवार, डॉ.शुभम देवगडे, डॉ.अश्विनी कांबळे, डॉ.इशा पठाण, फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. उद्घाटन समारंभानंतर ‘आरोग्यातून ग्रामनिर्माण : नागरिक-साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा अध्यक्षतेत परिसंवाद होईल. आदर्श गाव राजगडचे चंदू पाटील मारकवार आणि ग्रामीण रुग्णालय, गडचांदूरचे डॉ. प्रविण येरमे सहभागी होऊन मार्गदर्शन करतील. दुपारी १.३० वाजता ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ कवयित्री अर्जुमनबानो शेख यांच्या अध्यक्षतेत होणार असून कवी प्रदीप देशमुख आणि सुधाकर कन्नाके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रीती जगझाप त्यांच्या सूत्रसंचालनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांतील निमंत्रित कवी यावेळी कविता सादर करतील. कवी संमेलनात प्रब्रम्हानंद मडावी, प्रवीण तुराणकर, सुरेश डांगे, मालती सेमले, प्रवीण आडेकर, सुनील बावणे, जयवंत वानखडे, गीता रायपुरे, बाळू वाघमारे, संगीता बांबोळे, मंगेश जनबंधू, भीमानंद मेश्राम, भारती लखमापुरे, पराग भानारकर, शितल धर्मपुरीवार, सुरज गोरंटीवार हे नामवंत कवी सहभागी होतील. दुपारी ३ वाजता ‘लढाई व्यसनमुक्तीची : घरापासून समाजापर्यंत’ या विषयावर चर्चासत्र होईल. सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पारोमिता गोस्वामी अध्यक्षस्थानी राहणार असून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोडे आणि सोमनाथ व्यसनमुक्ती प्रकल्पाच्या डॉ. हेमलता पानगंटीवार सहभागी होऊन चर्चा घडवून आणतील.
सायंकाळी ५ वाजता समारोपीय सत्र डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते बंडू धोत्रे, लेखक-पत्रकार राजेश मडावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता डॉ. शारदा येरेमे आणि स्वागताध्यक्ष धनंजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. फिनिक्स साहित्य, सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव विजय वाटेकर यावेळी संमेलनात ठराव मांडणार आहेत. राज्यातील आरोग्य साहित्य संमेलनाचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असून साहित्यिक, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती, बल्लारपूर आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठानने केले आहे.