बंदुकीचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर; १४ आत्मसमर्पित माओवाद्यांना भूखंड

पुनर्वसनासाठी धनादेश, मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य; वाहनचालक परवान्यांचेही वितरण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १ : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वंकष पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मंगळवारी १४ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. याशिवाय पुनर्वसन निधीचे धनादेश, त्यांच्या मुलांना सायकल व शैक्षणिक साहित्य तसेच आत्मसमर्पित सदस्यांना वाहनचालक परवान्यांचे वितरण करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी हिंसाचाराला आळा बसत असताना शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला मिळणारा प्रतिसादही वाढत आहे. सन २००५ पासून सुरू असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत हिंसाचाराचे जीवन सोडून आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या माध्यमातून भूखंड, घरकुल, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाच्या समन्वयातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी आतापर्यंत १७४ भूखंड मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी यापूर्वी १५३ भूखंडांचे वाटप झाले असून, मंगळवारी आयोजित कार्यक्रमात आणखी १४ आत्मसमर्पित सदस्यांना भूखंडाचे प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी केंद्र व राज्य शासनाकडून पुनर्वसनासाठी मिळणाऱ्या निधीचे धनादेशही आत्मसमर्पित सदस्यांना वितरित करण्यात आले. त्यांच्या मुलांना सायकल आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच आत्मसमर्पित सदस्यांना वाहनचालक परवान्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी शासनाच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी जीवन जगावे, असे आवाहन केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन सन्मानाने जीवन जगण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि स्वयंरोजगाराशी संबंधित विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन समाजात सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे कौतुक केले. नव्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देत पुनर्वसनाच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना सक्षम करण्यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरूच राहतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., सहाय्यक जिल्हाधिकारी अजय डोके आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा राठोड तसेच पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

gadchiroli policeNaxal get landsurrender naxal
Comments (0)
Add Comment