हिवाळ्यात त्वचेला पोषण देणारे आमसूल तेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

Health tips :- 

हिवाळा आला की टीव्हीवर ‘व्यासलीन’, ‘बॉडीलोशन’ च्या जाहिरातींचा मारा होतो. कारण हिवाळ्यात आपली त्वचा रूक्ष होऊ लागते.

परिणामी कोरड्या आणि पांढ-या पडणा-या त्वचेला पोषण मिळावे म्हणून आपण बॉडीला स्निग्धाचे गुणधर्म मिळवण्यासाठी बॉडी लोशन किंवा व्यासलीन लावतो. मात्र, तुम्हाला माहित आहे जेव्हा व्यासलीनची निर्मिती होण्याआधी लोक आपल्या त्वचेला कशाने पोषण द्यायचे. अनेक जण यावर खोबरेल तेल किंवा तिळाचं तेलं असं उत्तर देतील. जे बरोबर आहे. मात्र, थंडीत त्वचेला रुक्षपणामुळे पडणा-या भेगा, किंवा त्वचेला तडे जाणे हे भरून येण्यासाठी आपल्याकडे एक खास आणि विशेष तेल होते. ते ‘आमसूल तेल’.

आमसूल तेल याला आताच्या भाषेत ‘कोकम बटर’ किंवा ‘कोकम तेल’

आमसूल तेल हे अत्यंत औषधी आणि त्वचेसाठी पोषक असे नॅचरल मॉइस्चराइजर आहे. तुम्हाला कदाचित हे नाव नवीन वाटत असेल मात्र, कोकणात आणि त्याला लागून प्रदेशात हे अजूनही वापरले जाते. थंडीत होट फाटणे, त्वचा तडकणे, पायांना भेगा पडणे इत्यादींवर हे एक रामबाण उपाय आहे. याला आताच्या भाषेत ‘कोकम बटर’ असेही म्हणू शकतो. अमेझॉनवर ‘Kokam Butter’ असे शोधल्यास तिथे ते मिळू शकते. मात्र, कालौघात आपल्याला याचे विस्मरण पडल्यामुळे याचे उत्पादन कमी-कमी होत चालले आहे. परिणामी हे थोडे महाग मिळते.

आमसूल तेल कसे बनते?

आमसूल ही कोकणात आढळणारी वनस्पती असते. तिला कोकम असेही म्हणतात. कोकमाच्या फळांपासून विविध पदार्थ केले जाते. त्यापैकीच ‘आमसूल तेल’ हे एक.

कोकम तेल तयार करण्यासाठी कोकमाच्या बियांचा वापर केला जातो. त्यासाठी कोकम बिया सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रामध्ये खणखणीत वाळवाव्यात. नंतर बियांवरील आवरण काढावे. आवरण काढलेल्या बिया दळणी यंत्रात दळून त्यांची भुकटी तयार करावी. अशी भुकटी उकळत्या पाण्यामध्ये दोन-तीन तास ठेवली जाते. नंतर हे द्रावण थंड केले जाते. द्रावण थंड झाल्यानंतर पाण्याच्या वर तवंग येतो. तो तवंग व्यवस्थित काढून त्याला उष्णता देऊन नको असलेले घटक बाजूला केले जातात. पुन्हा ते थंड केले जाते. यालाच कोकम तेल आमसूल तेल किंवा बटर म्हणतात. तेल काढण्याचे काम बहुतेक कुटीरोद्योग म्हणूनच केले जाते.

आमसूल तेल कसे दिसते ?

या तेलाचा रंग फिकट करडा किंवा पिवळसर असतो. ते वंगणासारखे गुळगुळीत व चवीला किंचित सौम्य असते. शुद्ध व वासरहित केलेले तेल रंगाने पांढरे आणि उत्तम प्रतीच्या हायड्रोजनीकृत (हायड्रोजनाचा समावेश केलेल्या) तेलासारखे (वनस्पतीसारखे) दिसते. गार्सीनियाच्या इतर जातींतील बियांमधील तेलाप्रमाणेच कोकम तेलात स्टिअरिक आणि ओलेइक अम्ले पुष्कळ प्रमाणात असतात. तेलाचा द्रवांक ४०० – ४३० से. असतो. हे तेल इतर स्निग्ध पदार्थ मिसळून मिठाईच्या धंद्यात लोण्याऐवजी वापरता येते.

नव्या संशोधन पद्धतीने या तेलामधून ४५ टक्केपर्यंत स्टिअरिक आम्ल मिळू शकते. हे तेल अंडाकृती गोळे किंवा वड्यांच्या स्वरूपात बाजारात विकले जाते.

गुणधर्म

स्निग्धता हा याचा गुणधर्म आहे तसेच हा जळजळशामक असतो. अंगाला खाज सूटत असेल किंवा त्वचेला खवले पडले असतील तरी आमसूलचे तेल लावले जाते. होट फाटणे, पाय फुटणे यासाठी ते वापरतात. याशिवाय इतर अनेक मलमांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त थंडीत पायांवर तसेच हाताचे कोपरे गुडघे अशा ठिकाणी त्वचा काळवंडते. आमसूलच्या तेलाच्या उपयोगाने काळवंडलेल्या त्वचेवरील मळ साफ होऊन त्वचा मऊ आणि सूंदर बनते.

कसे वापरावे

आमसूल तेल खड्याच्या स्वरुपात भेटते. त्यामुळे हे घट्ट असते. रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या कटोरीत घ्यावे. त्याला दोन मिनिटे गॅसवर उकळावे. ते लगेच पातळ होते. हे तेल रात्री झोपताना होट, चेहरा, मान, हात आणि पाय किंवा तडकलेल्या त्वचेवर चोळावे. सकाळी आंघोळ करावी.

हे देखील वाचा :-

health tipskokamkokam oil