दमा या आजाराचे कारणे व निदान.

लोकस्पर्श न्यूज स्पेशल 

हेल्थ रिपोर्ट

अलिकडल्या काळात दम्याच्या रोग्यांमध्ये वाढ होत आहे. दम्यास अस्थमा असे देखील संबोधतात. दमा हा फुफ्फुसातील श्‍वास वाहिन्यांशी निगडीत आजार असून विशेषतः श्‍वास सोडण्यात त्रास जाणवतो. तसे बघितले तर दम लागण्याची अनेक कारणे आहेत; जसे शरीरात रक्ताची उणीव, हृदयविकार, निकामे मुत्रपिंड अथवा शरीरावर अतिरिक्त चर्बी (लठ्ठपणा) आदी कारणांमुळेही दम लागू शकतो. मात्र, त्यास दम्याचा आजार म्हणत नाही. नेमकं बघायचं झालंतर फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्‍वास वाहिन्यांवर सुज आल्याने त्यांचा व्यास (डायमीटर) कमी होतो. त्यात स्त्राव वाढतो व त्यामुळे त्या वाहिन्या आकुंचन पावतात. अशा वेळी श्‍वास सोडताना त्रास होतो. एकूणच हा फुफ्फुसांचा आजार आहे.

दम्याची लक्षणे
श्‍वास वाहिन्यांवर आलेल्या सुजेमुळे व आतल्या स्त्रावामुळे फुफ्फुसाच्या क्रियान्वयनात अडथळा येतो. त्यामुळे दम लागत असतो. अशा वेळी जे कार्य आपण पूर्वी करीत होतो, तेच कार्य आता करताना अधिक त्रास जाणवतो. जसे की, पूर्वी घरात एक मजला चढून जाताना दम लागत नसे; मात्र नंतर तोच एक मजला चढून गेले तरी दम लागतो, तर किंबहुना दम्याचा त्रास असू शकतो. याशिवाय घरकाम करताना जी धुळ, उडते त्यामुळेही श्‍वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक अ‍ॅलेर्जीकारक घटक असतात. त्यातील प्रमुख घटक म्हणजे ‘हाऊस डस्ट माईट’. आणि या हाऊस डस्टमुळे अनेक लोकांना अ‍ॅलर्जी होऊन दमा होतो.
वारंवार सर्दी व खोकला देखील त्यामुळे होते. छातीत भरून येणे हे देखील याचेच लक्षण आहे. अनेकदा तर वर विशद केलेले एकही लक्षण आढळून येत नाही; केवळ खोकलाच असतो. अशा वेळी केवळ खोकला आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, हा खोकला देखील दम्यामुळेच असू शकतो. एकूणच सांगायचे तर नियमित खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे ही लक्षणे दम्याच्या आजारात ढोबळ मानाने आढळून येतात.

दम्याची कारणे
तशी दम्याचा आजार होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिकता हे दम्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. घरात कुणाला दम्याचा आजार असेल, तर अन्य सदस्यांना दमा होण्याची शक्यता असते. आणि हा दमा होण्यासाठी अ‍ॅलर्जी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असेल व त्या गोष्टीचा वारंवार संपर्क आला अथवा अ‍ॅलर्जी असलेल्या गोष्टींचे सेवन केले, तर रक्तातील काही घटक वाढतात. त्यातील इसोनिओफिल नामक घटक वाढतो. त्यामुळे देखील श्‍वासवाहिन्यांवर सुज येते.
वातावरणाचा आणि दम्याचा फार जवळचा संबंध आहे. हिवाळा अथवा थंड वातावरण, धुळ व प्रदुषणयुक्त वातावरण देखील दम्याचा आजार होण्यास पोषक असतात. वातावरणातील प्रदुषण देखील दम्याचा आजार होण्यास कारणीभुत ठरतात. याशिवाय ब्रोन्कायटिस, दीर्घकाल असलेला कफ यामुळे दम लागू शकतो. धुम्रपान देखील दम्याच्या आजारासाठी कारणीभूत ठरते. याशिवाय नियमित होणारे व्हायरल इंफेक्शन जसे स्वाईन फ्ल्यु आणि आता कोव्हिड-19 देखील दम लागण्यास कारणीभूत ठरत आहे.
सतत धुराशी निगडीत कार्य करणारे, पेंटिंग व्यवसाय करणारे अथवा स्प्रे पेंटशी निगडीत काम करणारे तसेच खाणीत कार्य करणारे, बांधकाम कार्य करणारे म्हणजे ज्यांच्या नाका व मुखाद्वारे छोटे धुलीकण फुफ्फुसात जाण्याचा धोका असलेल्या व्यक्तीला दमा होण्याची शक्यता असते. मात्र, या सगळ्यांच्या संपर्कात किती वेळेपर्यंत होते आणि त्याने फुफ्फुसावर किती परिणाम केला व प्रतिकारक शक्ती कशी आहे, यावरून त्याचे दुरगामी परिणाम दिसून येतात.

दम्याचे निदान कसे होते?
दम्याचे निदान होण्यासाठी काही चाचण्या कराव्या लागतात. पण आपणास वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकल्याचा प्रादुर्भाव होणे अशी लक्षण आढळून आली तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. डॉक्टर वैद्यकीय परिक्षण करून दम्याचे निदान करतात. यावेळी ते परिवारात कुणाला दमा आहे का आदींची विचारणा देखील करतात.
‘पीक-फ्लो’ मीटर नामक यंत्राद्वारे तुमची हवा फुंकण्याची क्षमता तपासून फुफ्फ्साची क्षमता तपासल्या जाते, त्यामुळे दमा आहे की, नाही याचे प्राथमिक निदान करता येते.
फुफ्फुस कार्यान्वयन चाचणी (स्पायरोमीटरी) : दमा आहे की, नाही याचे ठोस निदान करण्यासाठी फुफ्फ्स कार्यान्वयन चाचणी म्हणजे लंग्स फंक्शन टेस्ट करावी लागते. त्यास स्पायरोमीटरी असे म्हणतात.
याशिवाय रक्ताची तपासणी, एक्स-रे काढणे, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणे, अन्य आजारांमुळे तर दम लागत नाहीये ना याची चाचणी करण्यासाठी अन्य तपासणी करणे; जसे ह्रदयविकार कारणीभुत असल्यास इको काढणे इ. अशा प्रकारे दम्याचे निदान करता येते.

डॉ. अशोक अरबट
ज्येष्ठ श्‍वसनरोग तज्ज्ञ, नागपूर

asthma