कोविडमुक्त महाराष्ट्र’ आणि ‘ प्रदूषण मुक्त दिपावली’ साजरी करूया-पर्यावरण आणि वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन.

दिल्ली, राजस्थान, ओडीसा, सिक्कीम , कर्नाटक नंतर चंडीगड सरकारची फटक्यावर बंदी.

महाराष्ट्र सरकार ने अजून फटक्यावर बंदी आणलेला नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क दि. 6: सध्या आपण सर्वच कोविड -19 या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. या दिपावलीतही आपण सर्वांनी मास्क, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आणि दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे. कोविड -19 ला हद्दपार करण्यासाठी या दिपावलीत फटाके न वाजवता दिपावली आपण प्रदूषण मुक्त साजरी करुया. कोविड-19 विषाणूचा हल्ला हा माणसाच्या थेट फुफ्फसांवर होत असतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. ”चला आपण संकल्प करुया प्रदूषण मुक्त दिपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा” हा संदेश पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला आहे.

दिपावली म्हणजे फटाक्यांची आतषबाजी,.असा फार मोठा सामाजिक गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. पण आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायला हवे की, आज वातावरणातील प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरांमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे आणि,वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हवेच्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यातच दिपावलीच्या फटाक्यांची आतषबाजी करुन हवेचे व ध्वनीचे प्रदूषण मोठया प्रमाणात वाढत असते. फटाके फोडल्यानंतर त्यातून घातक रासायनिक वायू हवेत मिसळतात. उदा. सल्फर डाय ऑक्साईड,,कार्बन मोनोऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, अशा वायूंमुळे दिपावली नंतर श्वसनाचे विकार, घशाचे आजार बळावतात. त्यातच या फटाक्यांमध्ये असलेल्या हेवी मेटल्स उदा. कोबाल्ट, निकेल, मॅग्नेशियम असे धातू पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्यातून मोठे प्रदूषण होते..

साधारणत: दिपावली दरम्यानच थंडीला सुरुवात झालेली असल्याकारणाने पहाटे शहरांमध्ये दाट धुके दिसून येते. हिवाळ्यात थंड हवा जमिनीच्या जवळच साठून राहत असल्याने फटाके वाजविल्यानंतर त्यातील घातक वायू आपल्या जवळच असतात आणि त्याचा मानवी शरीरावर अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. हे सगळे टाळण्यासाठी आपण फटाकेमुक्त दिपावली साजरा करण्याचा संकल्प करुया…प्रदूषण मुक्त दिपावली साजरी केली जावी याकरता गेल्या काही वर्षापासून पर्यावरण विभाग म्हणजे अर्थातच आता नावात बदल झालेला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यांनी प्रदूषण मुक्त दिपावली साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवित असते. या मोहिमेदरम्यान शालेय विद्यार्थ्यांना फटाक्यांच्या दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात येते.