डोळ्यादेखत पतीला ठार; कोदुर्ली जंगलातील वाघाच्या हल्ल्याने खळबळ

पत्नीसमोरच ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू; परिसरात भीतीचे सावट, वनविभागाविरोधात संताप....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भंडारा : जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली जंगल परिसरात शनिवारी सकाळी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमावर जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवत इसमाला जागीच ठार केले. विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्याने परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक आपल्या पत्नीसोबत जंगल परिसरात गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्याच्यावर भीषण हल्ला केला. हल्ला इतका जबर होता की, संबंधित इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पत्नीने आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर परिसरातील गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि संबंधित वाघाला तात्काळ जेरबंद करावे, अशीही मागणी जोर धरत आहे.

कोदुर्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा असून, या घटनेनंतर जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे…

मुख्य वन संरक्षण गोंदियावन विभाग भंडारावन्यजीव मानवा संघर्ष
Comments (0)
Add Comment