लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यकर आयुक्त कार्यालयातील अन्वेषण शाखेकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीच्या प्रकरणात झालेल्या विलंबावर राज्य माहिती आयुक्तांनी हस्तक्षेप करत संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिल्यानंतर अखेर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य माहिती आयुक्त प्रदीप व्यास यांनी दिनांक १८ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशात अन्वेषण शाखेला १५ दिवसांच्या आत अर्जदारास माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशाच्या अनुषंगाने वस्तू व सेवाकर भवन, माझगाव येथील अन्वेषण-अ शाखेकडून दिनांक १० जून २०२६ रोजी माहिती पाठविण्यात आली असून, ती माहिती १२ जून २०२६ रोजी अर्जदार श्री. वसंत उटीकर यांना प्राप्त झाली आहे.
संबंधित प्रकरणात अर्जदार हे मूळ तक्रारदार असून, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशानंतर प्रक्रिया गतिमान होऊन माहिती उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात आर्थिक व्यवहार व करसंबंधित काही बाबींची माहिती मागविण्यात आली होती. माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रकरणातील काही मुद्द्यांवर स्पष्टता मिळाल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. तथापि, याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राज्य माहिती आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर माहिती उपलब्ध झाल्याने माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या परिणामकारकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.