रुग्णसेवेच्या ‘दीपस्तंभांचा’ गडचिरोलीत गौरव

फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात नऊ परिचारिकांचा सन्मान; सेवाभावाला सलाम...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : रुग्णाच्या वेदनेला स्पर्शातून दिलासा देणाऱ्या, संकटाच्या प्रत्येक क्षणी आरोग्य व्यवस्थेचा आधारस्तंभ बनणाऱ्या परिचारिकांच्या सेवाभावाला गडचिरोलीत मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित ‘फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

जिल्हा परिषद परिसरातील वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ परिचारिकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके तसेच जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना मान्यवरांनी परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा केवळ भाग नसून, त्या संपूर्ण व्यवस्थेची धडधड असल्याचे अधोरेखित केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा सक्षम ठेवण्यात परिचारिकांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद केले.

डॉ. वर्षा लहाडे यांनी “रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून ती संवेदनशीलतेची साधना आहे,” असे सांगत परिचारिकांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले.

तर डॉ. प्रताप शिंदे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जनसेवेसोबत स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे तितकेच आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले.

पुरस्कार विजेत्यांचा गौरव

आरोग्य सेविका श्रेणीत अर्चना मुऱ्हारी मडावी (प्रा. आ. केंद्र, पुराडा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रजनी कांचनलाल वासनिक (जिमलगट्टा) यांना द्वितीय, तर वैशाली भिवाजी झाडे (जिमलगट्टा) यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरोग्य सहाय्यिका श्रेणीत शोभा अरूण गेडाम (मालेवाडा) प्रथम, छाया नरेश गजभिये (कोटगुल) द्वितीय आणि विद्या हनुमंतराव ऊईके (पुराडा) तृतीय ठरल्या.

परिसेविका / अधिपरिचारिका श्रेणीत नजमा वाहीद बेग (ग्रामीण रुग्णालय, भामरागड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नंदा मनोहर वालको (जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली) यांना द्वितीय, तर सुनंदा रमेश चांदेकर (उपजिल्हा रुग्णालय, अहेरी) यांना तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विशेष कामगिरीचाही गौरव

कार्यक्रमात ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम’ (IDSP) अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका, सेवक व फार्मासिस्ट यांनाही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याशिवाय मुंबई येथे पार पडलेल्या DHPE प्रशिक्षणात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या स्मिता लोणारे आणि मीना राऊत या आरोग्य सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. संपूर्ण सभागृहात परिचारिकांच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञतेची भावना दाटून आली होती.

Gadchiroli health departmentHealth works
Comments (0)
Add Comment