भाजप कॉंग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत…

फडणवीस-चव्हाण भेटीने राजकिय चर्चेला उधाण...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 02,सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली असून अशोक चव्हाण यांनी सुद्धा ह्या भेटीचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अशोक चव्हाण काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या घडीला राज्यात काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी ७ आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. बऱ्याचकाळापासून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. यात एका माजी मुख्यमंत्र्यांसह ४ माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता काँग्रेसचे हे ७ आमदार कोण, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची गुरुवारी संध्याकाळी भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाटाघाटी झाल्या असण्याचा अंदाज आहे. भाजप नेते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणेश दर्शनाच्या निमित्ताने फडणवीस-चव्हाणांची भेट झाली. शिवसेना, काँग्रेस ते भाजप असा सर्वव्यापी प्रवास असलेले आशिष कुलकर्णी यांची नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती झाली होती. आता त्यांच्याच समन्वयातून फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या भेटीनंतर अशोक चव्हाण एखादा मोठा राजकीय निर्णय घेतात का, हे पाहावे लागेल.
अशोक चव्हाण भाजप मध्ये गेल्यास मराठवाड्यात भाजपची ताकद वाढू शकते. अशोक चव्हाणांचा पक्ष त्याग हा काँग्रेसला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे काँग्रेस हाय कमांड काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

हे देखील वाचा :-

झारखंड सरकारचा मोठा निर्णय !

Ashok ChavhanDevendra Fadanvismumbai