लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ८ : गोंडवाना विद्यापीठाची दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित असलेली सिनेट (अधिसभा) सभा अपरिहार्य कारणांमुळे तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी खेळीमेळीच्या व सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या प्रारंभी माजी अधिसभा सदस्य स्व. अॅड. गोविंद भेंडारकर, अधिसभा सदस्य रामदास आंबटकर, सामाजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे, सहकार नेते व शिक्षणतज्ज्ञ अॅड. बाबासाहेब वासाडे, प्राचार्य जयदेव देशमुख तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सोनाली भास्करवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. उपस्थित सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अधिसभेच्या कामकाजास सुरुवात झाली.
संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर अधिसभा सदस्य डॉ. पी. अरुणप्रकाश यांनी विद्यापीठाच्या सर्व शासकीय दस्तावेज, परिपत्रके व निर्देशांवर इंग्रजी तारखेसोबत भारतीय तारीख (शासकीय निर्देशांच्या अधीन राहून) नमूद करण्याचा प्रस्ताव मांडला. सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केला.
‘कर्मयोगी बाबा आमटे अध्यासन केंद्र’ सुरू करण्याबाबत डॉ. संजय साबळे यांनी मांडलेला प्रस्ताव सभागृहाने एकमताने मंजूर केला. यावेळी गुरुदास कांबळी व संजय गोरे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेत हे अध्यासन केंद्र प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठातील एलएलबी व एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीसोबत मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव डॉ. दिलीप चौधरी यांनी मांडला. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आत्मसमर्पित नक्षलवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून ‘गोंडवाना नवसंजीवन’ पुनरुत्थान कार्यक्रम राबविण्याचा ठराव डॉ. विवेक शिंदे यांनी सादर केला. सभागृहाने या प्रस्तावास अनुमोदन देत ठराव पारित केला.
गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील जागेवर प्रशासकीय इमारत उभारून नवीन कॅम्पस विकसित करण्याबाबत अधिसभा सदस्य गुरुदास कांबळी यांनी मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देश व राज्यस्तरीय नामांकित विद्यापीठांमध्ये (जे.एन.यूसारख्या) अभ्यास दौरे आयोजित करण्याचा प्रस्ताव दीपक धोपटे यांनी मांडला. या उपक्रमासाठी जिल्हा खनिज विकास निधीतून वार्षिक निधी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
विद्यापीठात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत नीलेश बेलखेडे यांनी मांडलेला प्रस्ताव सभागृहाने सर्वानुमते पारित केला.
संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतीय संविधानाची उद्देशिका गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक इमारतींच्या दर्शनी भागात गोंडी भाषेत लावण्याचा ठराव डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांनी मांडला. तसेच नागरिक कर्तव्यांविषयी जनजागृती कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करणे आणि नागरिक कर्तव्यांचा समावेश असलेला क्रेडिट-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव संजय रामगिरवार यांनी मांडला. हा विषय डीन बोर्डामार्फत सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याबाबत कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका मांडत ठराव मंजूर केला.
एकंदरीत विद्यापीठाच्या प्रशासकीय, शैक्षणिक व विकासात्मक मुद्द्यांवर सखोल चर्चा होत आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
सिनेट सभेचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी भूषविले. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तसेच सदस्य सचिव म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी काम पाहिले. बैठकीस सिनेट सदस्य, विद्यापीठ अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.