डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सुंदर मराठी भाषण

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 बाबासाहेबांच्या जयंती,12 एप्रिल – १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.

बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयीही लोकांना जागृत केले. बाबासाहेब म्हणायचे की, ‘मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजित असतो’. त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे ते आज ते कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भाषण

आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नममस्कार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. तुम्ही सर्वांनी मला भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वावर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथील एका दलित कुटुंबात झाला. बाबासाहेबांना लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्याकाळी अस्पृष्य मानल्या जाणाऱ्या समाजातून येत असल्याने आंबेडकरांना प्रत्येक गोष्टीत आपमानास्पद वागणूक सहन करावी लागली. त्यांच्या शाळेत ते एकमेव दलित विद्यार्थी होते, त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे.

भेदभाव आणि असमानतेचा सामना करत डॉ. आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले. यानंतर ते एमएसाठी अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तिथे त्यांनी पीएचडी केली. यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएससी, डीएससी, तर ग्रेज इन येथून बॅरिस्टर-एट-लॉ पदवी घेतली. ते भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते. विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते.

अस्पृश्यता आणि असमानेतीची वागणूक सहन केल्यानंतर, त्यांनी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी वाहून घेतले. ते संपूर्ण आयुष्य दुबळ्या लोकांच्या हक्कांसाठी लढले.

बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री बनवण्यात आले. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांशी सल्लामसलत केली. राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यांना संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते.  आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला. त्यांची जयंती देशाच्या अनेक भागात राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केले जाते. त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या सन्मार्थ ‘जय भीम’चा नारा देतात. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.

हे पण वाचा :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व ग्रंथोत्सवाचे आयोजन