लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ३१ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.) यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, युवक व महिलांसाठी उपयुक्त, भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत आणि कमी खर्चिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान, भारत (NIF) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
जिल्ह्यातील स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा सखोल अभ्यास करून एस.टी.आर.सी.ने सात कमी खर्चिक तंत्रज्ञानांची निवड केली होती. या तंत्रज्ञानांचे प्रस्ताव राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान, भारत यांच्याकडे सादर करण्यात आले होते. करारनाम्याअंतर्गत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येऊन संबंधित तंत्रज्ञान अधिकृतपणे विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात तंत्रज्ञानाधारित रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून मल्टीफूड प्रोसेसिंग युनिट तसेच मल्टी ट्री क्लाइंबर या तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी निवडक समुदाय सदस्यांना प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देण्यात आले.
मल्टी ट्री क्लाइंबरचे प्रात्यक्षिक धानोरा तालुक्यातील कोंदावाही येथे घेण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी कोयंबतूर येथील नवोन्मेषक श्री. श्रीवर्धन हे उपस्थित होते. ताडी व ताड काढणारे स्थानिक शेतकरी या प्रात्यक्षिकाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मल्टीफूड प्रोसेसिंग युनिट अंतर्गत विविध फळांपासून ज्यूस, जॅम, जेली, केचप तसेच साबण व जेल आदी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या परिसरात घेण्यात आले. संबंधित समुदाय सदस्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मूल्यवर्धित उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
याशिवाय कापूस वात बनविण्याचे यंत्र, मल्टी कमोडिटी ग्राइंडर, पानांपासून ताटे व वाट्या बनविण्याचे यंत्र, मका सोलणारे यंत्र तसेच बांबू पट्टी व रॉड बनविण्याचे यंत्र अशा इतर तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण येत्या महिन्यांत आयोजित करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण, लघुउद्योग व स्वयंरोजगाराला चालना, शेती उत्पादन प्रक्रियेत वेळ व खर्चाची बचत, स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण उत्पादन तसेच ग्रामस्तरावर उद्योगविकास साध्य होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमास गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपक्रमाची अंमलबजावणी एस.टी.आर.सी.चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख स्वप्निल गिराडे यांच्या नेतृत्वाखाली वैज्ञानिक अधिकारी व त्यांच्या चमूमार्फत करण्यात येत आहे.