पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कर्तुत्ववान महिलांनचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क

वरोरा, 31 मे – राजमाता अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी आदर्श शासक म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी केलेले न्यायिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे : अभिजित कुडे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत असे प्रतिपादन ग्राम सेवक पंकज थुल यांनी केले व उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल माहिती दिली.

आदर्श गाव उखर्डा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महिला व बालकल्याण मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व 500 रुपये धनादेश देवून सत्कार करण्यात आला. ग्राम पंचायत उखर्डा येथे ग्राम सेवक पंकज थुल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आशा वर्कर्स उखर्डा सौ. नंदाबाई रमेश कुडे , आशा वर्कर्स केळी सौ. मायाताई सागर ढोके यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी राजकुमार नगराळे, सागर तिजारे, मंदाताई उसरे, दुर्गाताई हिवरकर , कोल्हे मॅडम व महिला उपस्थित होत्या.