मा फाउंडेशन आणि युवा परिवर्तनतर्फे मा की रोटी प्रकल्पाचा शुभारंभ

६० आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार, दर महिन्याला कमावतात ६००० रुपये

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली, 12 एप्रिल – मा फाऊंडेशन भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) च्या सहकार्याने मां की रोटी या प्रकल्पाचे उद्घाटन गडचिरोली येथील अरमोली आणि औंधी ब्लॉक येथे करण्यात आले. हा प्रकल्प युवा परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे चालवण्यात येत आहे. यावेळेस SIDBI रांचीच्या व्यवस्थापक प्रेमा होरो, मा फाऊंडेशनचे कार्यक्रम प्रमुख तरंग मिश्रा आणि युवा परिवर्तनचे असोसिएट डायरेक्टर विलास कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मां की रोटी प्रकल्पात २० रुपयांमध्ये जेवण दिले जात आहे. यात दोन पोळ्या, एक भाजी, भात आणि आमटी असे पदार्थ असलेली थाळी देण्यात येते. सध्या गडचिरोली मध्ये सहा ठिकाणी हा प्रकल्प सुरु आहे. दररोज ५० माणसे याचा लाभ घेतात. यासाठी जेवण बनवण्याचे काम या ६० आदिवासी महिला करतात. चूल, मूल आणि शेती करणाऱ्या आदिवासी महिलांना आता यातून रोजगार मिळत आहे. ‘मा की रोटी प्रकल्पासाठी आम्ही आदिवासी महिलांचे 10 पेक्षा जास्त बचत गट स्थापन केले आहेत. यात महिला, घरीच किंवा कम्युनिटी किचन मध्ये जेवण बनवतात. त्यांना आम्ही जेवणासाठी लागणारे साहित्य देतो. दर आठवड्यासाठी आम्ही त्यांना मेन्यू ठरवून दिला आहे. अशा प्रकारे प्रत्येक महिला दर महिन्याला ६००० रुपये कमावते, असेही युवा परिवर्तनचे विलास कांबळे यांनी सांगितले.

महिलांना संघटित करून त्यांना रोजगार मिळवून देणे आणि स्वत:च्या पायावर उभे करणे हा या प्रकल्पाचा महत्वाचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत बचत गटांची बँक खाती उघडणे, त्यांना फूड लायसन्स साठी अर्ज करणे यासाठीही महिलांना मदत केली जात आहे. हा प्रकल्प गडचिरोली (महाराष्ट्र), मोहला मानपुरी (छतीसगड), सांबा (जेएनके), गजपती (ओडिशा) आणि (पश्चिम जैंता हिल्स) मेघालय या राज्यात राबवला जात आहे.

maa ki rotiyuva pariwartan