कोकणात ढगफुटीचा इशारा; रत्नागिरीसाठी 2 दिवस हाय अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 09 जून:- महाराष्ट्राच्या दक्षिणेत मान्सून  दाखल झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनचं मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहेत. अशातच भारतीय हवामान खात्याने कोकण विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस कोकणात ढगफुटी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुढील दोन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे.

मागील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशात 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादिवशी रत्नागिरीत पडणारा पाऊस ढगफुटी प्रमाणे असेल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे.

11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे या दोन दिवशी खबरदारीची उपाय म्हणून जिल्ह्यात कर्फ्यु लागू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिकेतील 31 गावांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर नदीला पूर येऊन पाणी संबंधित गावात शिरू शकते. त्यामुळे या गावांना अधिक धोका आहे.

kokan rainkokan wetherred alert