लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात माओवादीविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष अभियान पथक, प्राणहिता युनिट आणि बीडीडीएसच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले असून, घटनास्थळीच ते नष्ट करण्यात आले.
अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या चौकशीतून पोलीस मदत केंद्र-बिनागुंडा हद्दीतील जंगल परिसरात माओवाद्यांनी शस्त्रनिर्मितीसाठी साहित्य लपवून ठेवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहीम राबविण्यात आली.
दिनांक २२ मे रोजी जंगल परिसरात घेरा घालून बीडीडीएसच्या जवानांनी सखोल तपासणी केली असता, लेथ मशीन, १२ बोअर पाईप, बीजीएल पाईप्स, जनरेटर, इन्व्हर्टर, बॅटरी, ग्राइंडींग आणि ड्रिलींग मशीन, जीग सॉ मशीन, प्रेशर पंप, सोलर पॅनल तसेच इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. हे साहित्य माओवादी विविध घातपाताच्या कारवायांसाठी वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माओवाद्यांनी जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेल्या या साहित्याचा वापर नक्षल सप्ताह, निवडणुका आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यांसाठी करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, गडचिरोली पोलिसांच्या सततच्या कारवायांमुळे जिल्ह्यातील माओवादी हालचालींना मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, घटनास्थळी मिळालेल्या सर्व साहित्याचा नाश वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या कारवाईत विशेष अभियान पथक, प्राणहिता आणि बीडीडीएसच्या जवानांनी संयुक्तरित्या सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. सहभागी जवानांचे वरिष्ठांनी विशेष कौतुक केले आहे.