चामोर्शीत वेळेवर उपचार न मिळाल्याने नवजात बाळासह मातेचा मृत्यू; गडचिरोलीत संतापाची लाट

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आणि वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळण्याच्या जुनाट समस्येने पुन्हा एकदा एका निष्पाप मातेसह तिच्या नवजात बाळाचा बळी घेतला आहे. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे झालेल्या दिरंगाईनंतर गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आलेल्या २१ वर्षीय मातेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिजा हंसराज सातर (वय २१, रा. जामगिरी, ता. चामोर्शी) असे मृत मातेचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

जामगिरी येथील जिजा सातर यांचा गर्भधारणा कालावधी पूर्ण झाला होता. रविवारी (दि. २३) पहाटे ५ च्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सकाळी ९ वाजेपासून त्यांच्या प्रसूतीकळा अधिक तीव्र झाल्या. रुग्णालयातील परिचारिकांनी ‘काही वेळात प्रसूती होईल’ असा धीर दिला, मात्र प्रसूतीकक्षात जबाबदार वैद्यकीय अधिकारी हजरच नव्हते.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने स्वतःच तपासणी करत जिजाबाईंना गडचिरोली येथे हलवण्याचा (रेफर) निर्णय घेतला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेफर लेटरवर स्वाक्षरी करण्यासाठीही डॉक्टरांना बोलवावे लागले. “गडचिरोलीला नेईपर्यंत उशीर होईल, त्यामुळे येथेच तातडीने सिझरियन करा,” अशी आर्त विनवणी कुटुंबीयांनी केली; परंतु ती दुर्लक्षित करत अखेर सकाळी साडेदहा वाजता त्यांना गडचिरोलीकडे रवाना करण्यात आले.

उपचारात उशीर आणि दुहेरी आघात

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात पोहोचताच जिजाबाईंना थेट प्रसूतीकक्षात घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. प्रसूतीनंतर बाळ मृत असल्याचे समोर आले. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच, प्रसूतीनंतर प्रकृती अधिक खालावल्याने रात्री ९:५० च्या सुमारास जिजाबाई यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. एकाच दिवशी बाळ आणि मातेचा मृत्यू झाल्याने सातर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोषींवर निलंबनाची मागणी आणि राजकीय पडसाद

या घटनेनंतर गडचिरोलीतील सामाजिक व राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत:

निलंबनाची मागणी: माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी पत्रकार परिषद घेत, हा केवळ प्रसूतीतील गुंतागुंतीचा प्रकार नसून निव्वळ वैद्यकीय हलगर्जीपणा असल्याचा आरोप केला. चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण किलनाके आणि गडचिरोली महिला व बाल रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

जबाबदारी निश्चितीची मागणी: काँग्रेस नेत्या माधुरी मडावी यांनी या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित डॉक्टरांची उपस्थिती, उपचाराची वेळ, रेफर करण्याचा निर्णय, स्वाक्षरी आणि वैद्यकीय नोंदींची सत्यता तपासण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

चौकशी समिती गठीत

माता आणि बालकाच्या मृत्यूची घटना अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवाल प्राप्त होताच दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.”

— डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक, गडचिरोली

Chamorshi hospitalWoman death
Comments (0)
Add Comment