दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्ली, 17 ऑक्टोंबर : ‘आसियान’ या दक्षिण आशियातील दहा देशांकडे युवा लोकसंख्या आहे. या युवाशक्तीचा कौशल्य विकास करून त्यांना उपयुक्त मानव संसाधनांमध्ये परिवर्तित करण्याची ऐतिहासिक संधी या सर्व देशांना लाभली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासह दक्षिण आशियाई देशांनी कौशल्य विकास, उच्च शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

‘आसियान’ या दक्षिण पूर्व आशियातील दहा देशांच्या भारतातील राजदूतांनी तसेच वाणिज्यदूतांनी मंगळवारी (दि. १७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भारत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण पूर्व आशिया देशांमधील आर्थिक विकास, सामाजिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण आशियाई देशांमध्ये जगाच्या लोकसंख्येपैकी एकूण ६० कोटी लोक राहत असून एकूण ४५ लाख चौरस किमी इतके भौगोलिक क्षेत्र या देशांकडे आहे. या देशांमधील काही अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढत आहेत. या सर्व देशांचे महाराष्ट्राशी व्यापार संबंध आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र हे संबंध व्यापार व वाणिज्य इतकेच मर्यादित न राहता ते शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही वाढले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

भारत व दक्षिण आशियाई देशांमध्ये पर्यटन विकासाची प्रचंड क्षमता असून सर्व देशांनी आपापल्या पर्यटन स्थळांचा भारतात प्रचार-प्रसार करावा, तसेच भारतातील पर्यटन स्थळांचा आपल्या देशात प्रचार करावा, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.

महाराष्ट्र राज्यातील २६ विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण राज्यातील विद्यापीठे आणि ‘आसियान’ देशांमधील विद्यापीठांमध्ये अधिक सहकार्य पाहू इच्छितो, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी प्रत्येक देशाच्या राजदूताचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

दक्षिण आशियातील राजदूतांच्या शिष्टमंडळाचे नेते आणि ब्रुनेई दारुस्सलामचे भारतातील उच्चायुक्त दातो अलाईहुद्दीन हज मोहम्मद तहा यांनी राजदूतांच्या मुंबई भेटीची माहिती दिली. सिंगापूरचे उच्चायुक्त सिमॉन वॉंग यांनी सिंगापूर हा भारताचा जपान नंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विदेशी गुंतवणूकदार असून लवकरच आपण महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूकदार होऊ असा विश्वास व्यक्त केला. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर एमआयडीसीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी आभारप्रदर्शन केले.

यावेळी ब्रुनेई दारुस्सलाम, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम देशांचे राजदूत तसेच वाणिज्यदूत व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सर्व राजदूतांनी राजभवनातील ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. बैठकीचे आयोजन उद्योग विभाग तसेच एमआयडीसीच्या पुढाकाराने करण्यात आले होते.