झाडीपट्टीतील रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

नवी दिल्ली, दि. 25 जानेवारी : देशाच्या 74 व्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह 106 जणांचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे

केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातून एक नाव या यादीत आहे, ते म्हणजे परशुराम खुणे.

परशुराम खुणे यांनी आतापर्यंत 800 पेक्षा अधिक नाटकांचे पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आहेत. मराठी रंगभूमी त्यांनी गाजवली आहे. ‘संगीत एकच प्याला’ नाटकातील तळीराम, ‘सिंहाचा छावा’ मधील शंखनाद, ‘संगीत लग्नाची बेडी’तील अवधूत, ‘लावणी भुलली अभंगाला’मधील गणपा अशा त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.

परशुराम खुणे हे उत्तम जादूगार असून त्यांनी आपल्या या कलेचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी केला आहे. 20 वर्षे गुरनोली ग्रामपंचायतचे सरपंच राहिलेले खुणे शेतीत अनेक उपक्रम राबवून शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कारही पटकावला आहे. दहा वर्षे झाडीपट्टी कला निकेतन मंचाचे अध्यक्ष राहिलेल्या खुणे यांना झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचाही मान मिळाला आहे.

परशुराम खुणे यांनी अनेक नक्षलवादी तरुणांना हिंसा सोडून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं आहे. हा पुरस्कार म्हणजे गेल्या 50 वर्षाच्या कामाचं फलित असून हा पुरस्कार झाडीपट्टी रंगभूमीच्या रसिकांना अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया परशुराम खुणे यांनी दिली.

हे देखील वाचा : 

गडचिरोली पोलीस दलातील २९ पोलीस यांना मा. राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक” जाहीर

लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी, संजय मीणा

GadchiroliPadmshreeParshuram KhuneRangbhoomi