लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच एकमेकांना पेढे भरवून विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. दिल्लीतील जंतरमंतरसह विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शविला होता. शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि न्याय मिळावा, या मागणीसाठी अनेक सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आवाज बुलंद केला होता.
आंदोलकांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेसह देशभरातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीत यशस्वी होऊ शकत नाही, असा संदेश या घडामोडीतून गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी आंदोलकांनी, “सरकारला अखेर जनतेसमोर झुकावे लागले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भविष्यात शिक्षण व्यवस्थेत अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर गडचिरोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, हा विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.