श्रमजीवी सेवा दल आणि संघटनेकडून विद्येच्या मंदीरात विद्यार्थ्यांचे स्वागत…!

"गरीबांनसाठी सुरु असलेल्या जिल्हा परीषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा" - विवेक पंडित
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

उसगाव/ वसई दि.१५ जून : कोरोनाच्या महामारीमुळे दीर्घकाळानंतर आज विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विद्येच्या मंदीरात पाऊल ठेवले. या निमित्ताने श्रमजीवी संघटना आणि श्रमजीवी सेवा दलाकडून ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील गावागावातील जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी जंगी स्वागत केले आहे. मुलांनी उत्साहाने शाळेत जावे, त्यांना प्रोत्साहित करणे, शिक्षणाविषयी जनजागृती करणे, नविन प्रवेश घेणा-या मुलांचे स्वागत करणे ही श्रमजीवी संघटनेची गेल्या तीस वर्षांपासून सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे.

आज पासून राज्यातल्या शाळा सुरू झाल्या, विद्यार्थ्यांचा आज शाळेतला पहिला दिवस, त्यामुळे शाळेतल्या मुलांचं अगदी उत्साहात स्वागत करून त्यांना शाळेत येण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. परंतु मुलांना शाळेची गोडी लागावी, सर्वांना शिक्षण मिल्वे यासाठी श्रमजीवी संघटना सुरुवातीपासूनच प्रयत्न करीत आहे.

“चल शाळेमधी मंगला,

भिऊन पळू नको जंगला..

भोंगा शाळेत येऊन बस,

अभ्यास किती चांगला…”

अशी गाणी गात गावोगावी आणि खेड्यापाड्यात फिरून श्रमजीवी कार्यकर्ते मुलांना शाळेत आणण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर, गरीबी, भावंडाना सांभाळणे, बालमजूरी अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन 1990 सालापासून श्रमजीवी संघटनेने शिक्षणाच्या या प्रश्नांवर काम करण्यास सुरूवात केली. त्यातून भोंगा शाळा(वीटभट्टीवर उभारल्या जाणा-या झोपडीला भोंगा म्हटलं जातं) ही संकल्पना पुढे आली. त्यातून वीटभट्टीवर स्थलांतरित होणा-या मुलांना शिक्षण देण्यास सुरूवात केली. या संकल्पनेची दखल घेऊन पुढे सरकारने शिक्षणाचा कायदा येण्याच्या पुर्वी 1997 साली महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू केली.

श्रमजीवी संघटनेची ही शैक्षणिक परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे आज शाळेच्या पहिल्या दिवशी ठाणे पालघर रायगड नाशिक या चार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गावोगावी श्रमजीवी चे कार्यकर्ते आणि श्रमजीवी सेवादलाचे कार्यकर्ते मुलांना प्रोत्साहन देऊन ढोल ताशाच्या गजरात अतिशय आनंदाच्या वातावरणात मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ देऊन त्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील होते.

श्रमजीवी संघटनेने शाळा बाह्य मुलांसाठी शिबीर शाळा सुरू केली. शिबीर शाळा म्हणजे मुला-मुलींना वस्तीने राहून शिकता येईल अशी शाळा. त्यामाध्यमातून अनेक विद्यार्थांनी शिक्षण घेतले. पुढे आदिवासी मुलींकरिता एकलव्य परिवर्तन शिबीर शाळेची स्थापना केली.

आज संघटनेचे संस्थापक श्री विवेक भाऊ पंडीत व विद्युलत्ता ताई पंडीत यांच्या मार्गदर्शना खाली शासकीय आश्रम शाळा जिल्हा परीषदेच्या शाळेत पालघर,ठाणे,नासिक जिल्ह्यातील श्रमजीवी सेवा दलाच्या तरुणांनी विद्यार्थी व शिक्षकांचा जंगी स्वागत केले. आज आयोजित केलेल्या शाळकरी मुलांच्या स्वागतानिमित्त “गरीबांनसाठी सुरु असलेल्या जिल्हा परीषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा” अशी अपेक्षा विवेकभाऊ पंडीत यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

lead newsshramjivi Sanghatanashramjivi seva dalusgaonVasai PalgharVivek Pandit