माओवादी दहशतीचा बनाव करणाऱ्यांवर पोलिसांचा घणाघात; पिपली बुर्गीतील बॅनर-पत्रक प्रकरणी दोघे अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील माओवादी कारवाया जवळपास संपुष्टात आल्यानंतरही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी माओवादी असल्याचा बनाव रचणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाल रंगाचे बॅनर व पत्रके लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपींना तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे जेरबंद करण्यात आले. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१२ जुलै रोजी पिपली बुर्गीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर जिजावंडी टोल्याकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्शक फलकाजवळ लाल रंगाचा कापडी बॅनर आणि परिसरात दगडाखाली ठेवलेली दोन पत्रके आढळून आली होती. या बॅनर व पत्रकांमधील मजकूर माओवादी संघटनेच्या नावाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहिल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील तपशील आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अखेर या प्रकरणात शिवा अनिल मिस्त्री (वय ४८, रा. तरुणनगर, ता. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड) आणि रोहित रंजीत मल्लीक (वय २५, रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) यांचा सहभाग निष्पन्न झाला. दोघांनी माओवादी असल्याचा आभास निर्माण करून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी १४ जुलै रोजी पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील विविध कलमांसह बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

गडचिरोली पोलिसांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने राबविलेल्या ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवादी संघटनेची दहशत प्रभावीपणे मोडून काढण्यात यश मिळाले आहे. अशा परिस्थितीत माओवादी नावाचा वापर करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच नागरिकांनी अफवा, बनावट बॅनर किंवा पत्रकांवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी आणि कायदा हातात घेण्याचा किंवा समाजात भीती पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन त्यांनी केले.

Fake naxal banner
Comments (0)
Add Comment