लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोंसले गुरुवार, आज दि. २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासह विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात विशेष आढावा बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
मंत्री भोंसले यांच्या नियोजित दौऱ्याची सुरुवात सकाळी ११.४५ वाजता मौजा अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या परिसराच्या पाहणीने होणार आहे. सकाळी ११.४५ ते १२ वाजेपर्यंत ते विद्यापीठ परिसरातील सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीची माहिती घेतील.
त्यानंतर दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात गोंडवाना विद्यापीठ, मायनिंग कॉरिडॉर प्रकल्प तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (AIIB) अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या वेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून प्रकल्पांची सद्यस्थिती, कामांची प्रगती आणि अंमलबजावणीतील बाबींचा आढावा मंत्री भोंसले घेणार आहेत.
दुपारी २.५० वाजता मंत्री भोंसले कोनसरी प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. गडचिरोलीच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या कामकाजाची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर ते चामोर्शी-हरणघाट रस्त्याच्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
या पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रराजे भोंसले भंडारा जिल्ह्याकडे रवाना होतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्ते विकास, विद्यापीठाच्या कामांसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या प्रगतीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.