लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सचिन कांबळे,
अहेरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व आयबीपीएस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत अहेरी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे रामदास कोंडागोर्ला यांनी समूह साधन केंद्र, अहेरी येथे समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदाचा कार्यभार स्वीकारला.
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर या दुर्गम गावातून आलेल्या रामदास कोंडागोर्ला यांनी मागील १७ वर्षांपासून अहेरी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात करत त्यांनी विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच तालुका फुलोरा समन्वयक म्हणून कार्य करत शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले.
अतिदुर्गम आणि आव्हानात्मक परिस्थिती असलेल्या दामरंचा, ताटीगुडम यांसारख्या भागात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पुनरुज्जीवनासाठी केलेले त्यांचे प्रयत्न तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून केलेले कार्य यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून या पदापर्यंत पोहोचलेल्या कोंडागोर्ला यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नी, मुलं, आई-वडील, गुरुजन, सहकारी आणि मित्रपरिवाराला दिले.
अहेरी समूह साधन केंद्रातील मुख्याध्यापक उमेश चिलवेलवार (चिंचगुंडी), अविनाश कविराजवार (अहेरी), सुधाकर घोसरे (चेरपल्ली), गंगू सिडाम (गडबामणी), सुधाकर वेलादी (गडअहेरी), उमा कारेंगुलवार (किष्टापूर), सुशीला पोरतेट (अबनपल्ली), मंदा ऐलावार (कोत्तूर), सुनील मामीडवार (व्येंकटरावपेठा), पदमा गोडसेलवार (कोत्तागुडम), विशेष शिक्षक जितेंद्र राहूड तसेच प्रथम फाउंडेशनच्या राजश्री बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.या दरम्यान प्रभारी केंद्रप्रमुख उमेश चिलवेलवार यांच्याकडून केंद्रप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला…
शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, प्रशासनिक कौशल्य आणि दुर्गम भागातील शिक्षणासाठी असलेली तळमळ लक्षात घेता रामदास कोंडागोर्ला यांच्या नियुक्तीमुळे अहेरी समूह साधन केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये गुणवत्ता विकास, शिक्षक मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे…