एसीबीच्या जाळ्यात फसला अहेरीचा पोलीस निरीक्षक

पोलीस दलात खळबळ, महिन्याभरातील दुसरी घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 05 सप्टेंबर :- अहेरीत एक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे. अटक झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे श्याम गव्हाणे. याबाबतची हकीगत अशी की, एका गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याकरिता, तसेच ट्रकने खनिजाची वाहतूक विनाअडथळा करु देण्यासाठी एका वाहतूकदाराकडून १ लाख रुपयांची लाच श्याम गव्हाणे याने मागितली. तक्रारदाराला ही रक्कम देणे शक्य नव्हते. म्हणून तक्रारदाराने या पोलीस निरीक्षकाची तक्रार एसीबी कडे केली. चंद्रपूरच्या एसीबी अधिकाऱ्यांनी सापळा रचत १ लाख रुपये लाच स्वीकारताना आज अहेरी येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे याला रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ माजली आहे.

चंद्रपूर एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा अहेरीनजीकच्या नागेपल्ली येथील रहिवासी असून, तो गौण खनिजाची ट्रकद्वारे वाहतूक करतो. एका प्रकरणात त्याच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सध्या तो सुरजागड येथील लोहखाणीतून ट्रकद्वारे कच्च्या लोखंडाची वाहतूकही करीत आहे. परंतु ही वाहतूक विनाअडथळा करु देण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तक्रारकर्त्यास १ लाख रुपयांची लाच मागितली. परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याने चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला असता पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनात १ लाख रुपये घेताना ठाणेदार गव्हाणे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीचे नागपूर येथील पोलिस उपायुक्त राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक मुधकर गिते, तसेच चंद्रपूर एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, रवीकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, सतीश सिडाम यांनी ही कारवाई केली.

अहेरीत महिनाभरात दुसरी कारवाई
२८ जुलैला अहेरी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील एका हवालदाराला एका अवैध दारु विक्रेत्याकडून ८० हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली होती. त्यानंतर आता महिनाभरातच अहेरी येथील पोलिस विभागातील अधिकारी १ लाखांची लाच स्वीकारताना अडकला आहे.

हे देखील वाचा :-

 

@spgadchiroliacb trapgadchirolinfogadchirolipolicepolice in acb trap