गडचिरोली पोलिसांच्या रक्तदान उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद

‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ५०३ जणांचे रक्तदान;४८६४ युनिट रक्तसंकलनाचा टप्पा पार...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात सुरक्षा, विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत जनतेशी विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त मानवतेचा एक प्रेरणादायी अध्याय रचला. पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जिल्ह्यात तीन ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ५०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून जीवनदानाच्या चळवळीत मोलाचा सहभाग नोंदविला.

पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता (अहेरी) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे आयोजित शिबिरांमध्ये पोलीस अधिकारी-कर्मचारी, सीआरपीएफ व एसआरपीएफ जवान, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करत अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला.

विशेष म्हणजे, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे १७०, उपमुख्यालय प्राणहिता येथे २२८ तर सिरोंचा येथे १०५ अशा एकूण ५०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत आयोजित सहा रक्तदान शिबिरांमधून एकूण ४८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले असून हा आकडा समाजसेवेच्या क्षेत्रातील एक उल्लेखनीय टप्पा मानला जात आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून जीवन वाचविण्याची सर्वोच्च मानवी सेवा आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे ऋण फेडण्याची संधी रक्तदानातून मिळते. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

रक्तदान शिबिरादरम्यान रक्तदात्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट-३०३०, शालिनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर यांच्यासह विविध संस्थांनी सहकार्य केले.

गडचिरोली पोलीस दलाने दादालोरा खिडकी आणि प्रोजेक्ट उडानच्या माध्यमातून राबविलेल्या या उपक्रमामुळे पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली असून, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Gadchiroli police blood donation campWorld blood donation day
Comments (0)
Add Comment