लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली,
गणरायाच्या आगमनाला आता अवघे १२ दिवस उरले आहेत… त्यामुळे गडचिरोलीतील मूर्तीकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे. बाप्पाच्या मूर्तींना अंतिम टच देण्याचे काम वेगाने सुरू असून, भाविकांकडूनही मूर्तींची मागणी वाढत आहे. आकर्षक कलाकृती, विविध आकार आणि सजावटीमुळे मूर्तींना विशेष मागणी आहे.
मात्र, या भक्तीच्या उत्साहात पर्यावरणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असतात आणि सहाजिकच नागरिकही आकर्षक असल्याने घेण्यासाठी वळतात मात्र त्या मुर्त्या पाण्यात सहज विरघळत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. त्याउलट नैसर्गिक मातीची मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात मिसळून जाते. त्यामुळे पर्यावरण पूरक असल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोलीतील माती मूर्तींसाठी योग्य नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विहीरगाव येथून माती आणली जाते. त्यामुळे त्या मातीची वाहतूक किंमत वाढत असल्याने महागाईचा परिणाम मूर्तींच्या किमतीवर झाला असला, तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. सध्या बाप्पाला अंतिम रूप देण्याच्या कामात मूर्तीकार व्यस्त असून, भाविकांसाठी त्यांच्या कार्यशाळा सज्ज झाल्या आहेत.