लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव परिसरावर बुडीत दुर्घटनांचे संकट कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका जीवाचा बळी गेला आहे. घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो चालविणारे पंकज वाटगुरे यांचा गावालगतच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कालच सती नदीत तीन निष्पाप विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज वाटगुरे यांनी दिवसभर शेतीतील रोवणीचे काम पूर्ण केल्यानंतर आंघोळीसाठी गावाशेजारील तलाव गाठला. पाण्यात उतरल्यावर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात बुडाले. बराच वेळ ते दिसून न आल्याने नागरिकांनी शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तलाव परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन मडावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व शोधकार्य सुरू केले. स्थानिक मासेमारांच्या मदतीने तसेच विशेष पथकाच्या सहकार्याने मृतदेहाचा शोध घेण्यात आला असून घटनास्थळी पोलीस पोचून अधिक तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या चोवीस तासांपूर्वी खेडेगाव येथील सती नदीत तीन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेचे दुःख अद्याप ताजे असतानाच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आणखी एक जीव गेल्याने नागरिकांमध्ये भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.
पंकज वाटगुरे हे कुटुंबातील प्रमुख कमावते सदस्य होते. ऑटोचालक म्हणून प्रामाणिकपणे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुणाच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, खेडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.