जळीत बांबू डेपो चे राजकारण करू नये!

स्थानिक कामगारांचे राजकर्त्याना आवाहन ; पेपर मिल कळमना डेपो आग प्रकरण.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बल्लारपूर. ता.०४ जून :- २२ मे रोजी पेपरमिल उद्योग समूहाच्या कळमना डेपो’ला भिषण आग लागली. या भिषण आगीत व्यवस्थापनाचे ३ डेपो भस्मसात झाल्याने जवळपास ५० कोटी रुपयांचा बांबू आणि लाकूड जळून खाक झाला. घडलेल्या घटनेची प्रत्यक्ष पाहणी शासकीय स्तरावर आणि व्यवस्थापनाच्या दिल्ली कार्यालयाकडून करण्यात आली. आणि भविष्यात अश्या घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. सार काही पूर्वपदावर येत असताना दुसरीकडे मात्र, काही राजकीय आणि सामाजिक संघटना या घटनेचा बाऊ करून कारखान्याला अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. राजकर्त्याच्या या भूमिकेविरोधात कामगारांकडून संताप व्यक्त होत असून, अश्या राजकीय आणि सामाजिक संघटनांनी कारखान्याला अडचणीत आणू नये. असे आवाहन या संघटनांना कामगारांनी केले आहेत.

बल्लारपूर शहराची अर्थवाहीनी असलेल्या बल्लारपूर पेपरमिल कारखान्यात आजघडीला जवळपास १० हजार कामगार कार्यरत असून शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के नागरिकांचे उदरनिर्वाह प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष या उद्योगावर चालतो. त्यामुळे पेपरमिल’ला या शहराची अर्थवहीनी असे संबोधले जाते. त्यामूळे पेपरमिल अडचणीस आल्यास स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळित होऊ शकते. हि बाब लक्षात घेता, कुठल्याही कारणाने उद्योग समूह अडचणीत येऊ नये. अशी भावना कामगारांसह स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.

स्लज गार्डन परिसरात आगीची घटना 

शुक्रवार दि.०३ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास जंगलाच्या दिशेकडून पेपरमिल डेपो कडे आग पसरली. मात्र, व्यवस्थापनाने वेळीच दखल घेतल्यामुळे आग डेपो जवळ येण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळविण्यात पेपरमिल आणि अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले. जंगल लगत परिसरात नागरिकांची वस्ती असल्यामुळे मोठे अनर्थ टळले.

आपातकालीन परिस्थितीसाठी अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा सज्ज

पेपरमिल स्लज गार्डन जवळील डेपो परिसरात व्यवस्थापनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहेत.

वनविभागाने वेळीच दखल घ्यावी 

जंगलात पाला पाचोळा जाळण्यासाठी वनविभागाच्या वतीने आग लावल्यामुळे आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. या आगीच्या घटनाची निपक्षपणे चौकशी करून वनविभागावर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

पलीकडे आग, अलीकडे वन्यप्राण्यांचा वावर 

मागील काही दिवसांपासून जंगल परीसरात आग दिसून येत आहे. परिणामी, या आगीमुळे शेजारी असलेल्या पेपरमिल वसाहतीत, बॉटानिकल पार्क आणि विसापूर गावालगत बिबट नर आणि दोन बछड्यांसह मादीचा वावर दिवसाआड दिसून येतआहे. शुक्रवार दि. ०३ जून रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास पेपर मिल वसाहतीत बिबट दोन बछड्यासह घुसला. रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यासाठी पेपर मिल सुरक्षा रक्षकांचे प्रयत्न सुरू होते.
त्यामुळे एकीकडे आगीच्या घटना तर दुसरीकडे वन्य प्राण्याचा वसाहती परिसरात प्रवेश यामुळे व्यवस्थापनाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हे देखील वाचा : 

ब्रेकिंग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जण ठार

कश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही!, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही

राज्यात 6 जून “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा होणार

 

lead news