खाजगी बस पलटल्याने अपघात ; तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी

कोरची तालुक्यापासून तीन किमी अंतरावर असलेल्या बेळगाव वळणावरील घटना...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली जिल्ह्यात कोरोना १९ पासून  आगार विभागामार्फत बसेस कमी  केल्याने खाजगी वाहन चालकांची  मुजोरी वाढली असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून घेऊन जात आहेत. एवढेच नव्हे तर एखाद्या प्रवाशाने काही प्रश्न केल्यास दमदाटी सुद्धा करण्याचे प्रकार कित्येकदा प्रवाशाने कथन केले आहे . मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याने खाजगी वाहन चालकांचे मनमर्जी, उर्मटपणा कित्येकांना याचा मनस्तापही सहन करावा लागलेला आहे. हे सगळं उदांत खरे असले तरी आगार विभागाचे बस नसल्याने शाळेकरी विद्यार्थ्यांसह  जन सामान्यांचा जीव टांगणीला टाकून खाजगी बसने प्रवास केल्याशिवाय पर्याय नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सामान्य नागरिकांची अडचण दूर करण्याची मागणी नागरिकात जोर धरू लागली आहे.

कोरची दि,२५ नोव्हे : खाजगी बस (ट्रॅव्हल्स) ने  वडसाकडे जात असताना कोरची शहरा पासून तीन किमी अंतरावर असलेल्या बेळगाव वळणावर गाडीचे अक्सल तुटल्याने वाहन चालकांचे नियत्रंण सुटून वाहन पलटल्याने तीन गंभीर तर पंधरा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आकाश ट्रॅव्हल्स कोरचीवरून वडसाकडे जात असताना बेळगावच्या वळणावर वाहन क्रमांक एम एच ४० एम १०१४  या खाजगी बसचे  एक्सेल तुटल्याने वाहन चालक धर्मेंद्र नारद फुलारी यांचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने बस वळणावर पलटली.

सदर अपघात सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान बेडगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत घडला असून यामध्ये तीन प्रवासी गंभीर तर १५ किरकोळ जखमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खाजगी बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते .

या अपघातात दिपीका सोनू शिकारी (२५) रा. देवरी, ता.रतनपूर, जि बिलासपूर (छत्तीसगड) हिला छातीला व डाव्या हाताला तसेच डोक्याला जबर मार लागले आहे. सध्या ही (कोटगुल) शिवराजपुर येथे आपल्या परिवासासह वास्तव्यास राहत असून सिंदीपासून तयार केलेल्या झाडूची विक्री करण्यासाठी वडसेला जात होती. सौ.आम्रपाली गोकुळ जांभुळकर (३६) रा.चपराड, ता. लाखांदूर,जि.भंडारा हिच्या पाठीला व डाव्या हाताला मुक्का मार लागले आहे. ही महिला बोरीवरून आपल्या पुतणीला गावी घेऊन जाण्यासाठी आली होती. तर कोरची आश्रम शाळेतील कामाठी आनंदराव नारायण मरापे (५८) यांना डाव्या बाजूला मुक्का मार लागला असून हे चिमूरला मित्राच्या घरच्या वास्तूपूजेला जाण्यासाठी खाजगी बस (ट्रॅव्हल्स( ने निघाले होते. या तिघांनाही गंभीर मार असल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.

१५ किरकोळ जखमी मध्ये बोरी येथील पोस्टमास्टर कु. निकिता टेंभुर्णे (२१), श्यामलाल रामजी पुरामे (६५) रा.सोनपूर, शांताबाई ठाकुराम मडावी (३५) रा. कोरची, ललिता नारायण पडोटी (४०) सोनपूर, कुमारी अरविंद गावळे (३०) नांदनी, रामदास पांडुरंग जांभुळकर (७०) रा. चपराड, अरमान सोनू शिकारी अडीच वर्षे रा.शिराजपुर, जयाबाई गणेश धुर्वे (६८) रा. कुरखेडा, रसिका रामदास जांभुळकर (६७) रा. चपराड, रामचंद्र दुनियाजी तांडेकर (७५) रा. बेडगाव, निकिता विशाल टेंभुर्णे (२१) वर्षे रा. बोरी, नीलम मनोज मडावी (२१) वर्ष रा.मोहगाव, रचना सोनू शिकारी (०७) रा. शिराजपुर, मनोज सुधाराम मडवी (२५) वर्ष रा. मोहगाव, नंदिनी सोनू शिकारी (३४) वर्ष रा. शिराजपुर, रंन्तु शिवकुमारी शिकारी (४०) वर्ष रा.शिराजपुर यांना कोरची ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय थुल, डॉ.राहुल राऊत डॉ.सचिन कवाडकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह प्राथमिक उपचार देत आहेत.

सदर अपघाताची माहिती मिळताच बेळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच बेळगाव येथील ग्रामस्थ व कोरची येथील ग्रामस्थ या घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील खाजगी बस (ट्रॅव्हल्स) मधील जखमी प्रवासी नागरिकांना बस समोरच्या कॅबिन मधून तर काहींना मागच्या कॅबिनचा काच फोडून जखमी प्रवासी नागरिकांना बाहेर काढून त्यांना १०८ व खाजगी वाहनातून कोरची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बातमी लिहीपर्यंत अपघातील सहा जखमी प्रवासीं लोकांना हलविण्यात आले आहे. या अपघाताबाबत कोरची पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला असून अधिक तपास कोरची पोलीस निरीक्षक अमोल फळतरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव पोलीस अधिकारी अनिल नानेकर हे करीत आहेत.

शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी व मुलींसाठी मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्याला जिल्हा अधिकारी यांनी ६ बसेसची सोय करून दिली आहे पण गडचिरोली आगार व्यवस्थापकांनी शैक्षणिक सत्र अर्धे संपून गेले तरी एकही बस सुरू केली नाही. कोरची पंचायत समितीने यासाठी पुढाकार घेऊन बसेस सुरू करण्यासाठी ठराव पाठवले होते त्याही ठरावाला आगार व्यवस्थापकांनी केराची टोपली दाखवली त्यामुळे आज ही तीन-तीन चार-चार किलोमीटर अंतरावर विद्यार्थिनी पायी प्रवास घेऊन शिक्षणाचे धडे घेत आहेत. एकेकाळी गडचिरोली व ब्रह्मपुरी आगाराला भरघोस उत्पन्न देणाऱ्या ब्रम्हपुरी आगारची कोरची-नागपूर, ब्रम्हपुरी-कोरची-देवरी- गोंदिया, गडचिरोली आगार च्या गडचिरोली-कोरची- बोरी, गडचिरोली-कोरची-कोडगुल या बसेस आगार व्यवस्थापकांनी बंद केल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे हे विशेष बाब आहे.

हे देखील वाचा : 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा अमलात

 

भोकर मध्ये तब्बल अकरा लाखाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

bus accidentKorchi