लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (NICU) शनिवारी सायंकाळी काही क्षणांसाठी अक्षरशः धोक्याच्या छायेत आला. विद्युत पॅनलमध्ये झालेल्या अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. त्या वेळी अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेली १३ नवजात बालके धोक्याच्या छायेत होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग काही मिनिटांत नियंत्रणात आली आणि संभाव्य भीषण दुर्घटना टळली.
सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास विद्युत पॅनलमधून धूर व ठिणग्या बाहेर पडू लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या. अग्निशमन यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे NICU विभागातील जीवनरक्षक उपकरणे आणि ऑक्सिजन यंत्रणेला धोका निर्माण होण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनेच्या वेळी रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमामुळे अनेक कर्मचारी तळमजल्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संवेदनशील विभागात त्या वेळी अत्यल्प कर्मचारी उपस्थित असल्याची चर्चा सुरू झाली. अचानक धूर पसरल्याने नवजात बालकांचे पालक, गर्भवती महिला आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ रुग्णालय परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
रुग्णालयाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी किरणाके यांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची पुष्टी केली. कर्मचाऱ्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिल्यामुळे सर्व १३ नवजात बालके पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेनंतर जिल्हा मुख्यालयातील सर्वात महत्त्वाच्या मातृ-शिशु आरोग्य केंद्रातील अग्निसुरक्षा, विद्युत देखभाल आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवजात बालकांवर उपचार होणाऱ्या अतिसंवेदनशील विभागात नियमित इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट, फायर सेफ्टी ऑडिट, कार्यरत अग्निशमन यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत प्रशासनाने तातडीने पुनरावलोकन करावे, अशी मागणी नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा विलंब झाला असता तर गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेसमोर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेचे विशेष लेखापरीक्षण हाती घेण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.