शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेती विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजू शेट्टी, कपिल पाटील, प्रतिभा शिंदे, अर्जुन कोकाटे यांनी दिले निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 28 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेती विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने देशभरात 10 लाख सहया गोळा करण्यात आल्या. फक्त महाराष्ट्रात सहा लाख सह्या गोळा करण्यात आल्या. त्यांचे एक संयुक्त निवेदन आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकरी नेते राजू शेट्टी व प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी आमदार कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, नितिन मते, राजा कांदळकर, अबिद शेख, चंद्रकांत म्हात्रे, सचिन बनसोडे, रोहित ढाले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत महाराष्ट्राभर 6 लाख 75 हजाराहून अधिक सहयांची निवेदने स्थानिक तहसिलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सेवा दल पदाधिकारी आणि समविचारी कार्यकर्त्यांनी दिली.

केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही शेती विषयक कायदे शेतकरी विरोधी असून त्यातून देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. या कायद्यांच्या विरोधात गेली तीन महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरु आहे. त्याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेती विरोधी तीनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी करण्यासाठी ही सहयांची मोहीम घेण्यात आल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांनी दिली आहे.


bhagatsingh koshyari