गोंड जातीच्या ८ मुलींनी सुरु केला रंगकामाचा व्यवसाय, महिन्याला कमावतात ३२,००० रुपये

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

गडचिरोली,29 मार्च- देशातील दुसरी मोठी आदिवासी जमात गोंड जमात. महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यांचे वास्तव्य आढळून येते. गोंड जमात ही शेती, तसेच शिकार करून आपले पोट भरतात. त्यात अठराविश्वे दारिद्य आणि त्यात शिक्षणाचा गंधही नसतो. असे असतानाही अडचणींवर मात करत बांधकामासारख्या पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात गोंड जातीच्या या मुलीेंनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गडचिरोलीतील गोदालावही गावातील ८ मैत्रिणींनी प्लंबिंग, इलेक्ट्रीकल तसेच पेंटिंग अशी कामे करून दर महिन्यात ३२,000 हजार रुपये कमावत आहेत. गोदालवाही गावात ४० आदिवासी मुलींनी युवा परिवर्तन संस्थेचा मल्टिस्कील कोर्स केला. यात त्या प्लंबिंग, इलेक्ट्रीकल, पेंटिंग यासारख्या गोष्टी शिकल्या. हा कोर्स शिकल्यावर अनुसूया गावडे, सुनिता पाडा, अंजली उसेंडी, वैशाली माडवी, वंदना बोगा यासह २ मैत्रिणींनी कामे करण्यास सुरूवात केली.

अनूसूया गावडे सांगते की, ”कोर्स पूर्ण झाल्यावर आम्हाला काम मागायला लाज वाटायची. कारण याआधी आम्ही कामासाठी घराबाहेर कधीच पडलो नव्हतो. आम्हाला कसे बोलायचे. ते सुध्दा माहित नव्हते आणि गावकऱ्यांनी पहिल्यांदा तुम्ही मुलांची कामे कशी करणार असे सांगत नकार दिला. शेवटी धीर एकवटून आम्ही सर्व गोष्टी शिकलो. आणि पहिल्यांदा एका ग्रामपंचायतीची भिंत रंगवली. अशी छोटी कामे करता करता आम्हाला मोठ्या कामाचे कंत्राट मिळाले ”
त्यानंतर अनुसूया आणि तिच्या मैत्रिणी ग्रामपंतायतीच्या मदतीने अंगणवाडी, शौचालय, घराच्या भिंती रंगवण्याचे काम करत आहेत.”आम्ही तीन महिने झाले हे काम सुरू केले आहे. पहिल्या महिन्यात मी ४ हजार रुपये कमावले. पहिली मेहनतीची कमाई घरी आई वडिलांना देताना समाधानही मिळाले. कुटुंबियांनाही माझा अभिमान असल्याचे अंजली उसेंडी हिने सांगितले. अंजली हिला शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करायची आहे. गोंड जातीच्या मुलींची ही कहाणी सर्वसामान्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.

 

adiwasi youth businessGadchiroliKherwadi social welfareyuva pariwartan