आदिवासी विकास महामंडळाच्या भोंगळ कारभारा विरोधात शेतकरी आक्रमक..

दोन दिवसात खात्यात रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मनोज सातवी / पालघर, 19 मार्च – पालघर जिल्ह्यातील भात (धान)उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात आले आहे. मात्र दोन महिने होऊन सुद्धा त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले बँकेचे पीक कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. विशेष म्हणजे होळीचा सण तोंडावर आलेला असताना आदिवासी विकास महामंडळाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांची होळी देखील कोरडीत जाणार का..? असा सवाल विचारला जात आहे.

एकीकडे आर्थिक वर्ष संपत असताना बँका आणि सेवा सहकारी सोसायटीकडून पीक कर्ज वसुलीसाठी तकादा लावला जात आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळ मात्र कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेऊन असल्यामुळे पीक कर्ज फेडायचे कसे, शिवाय वेळेत कर्जफेड केली नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आज आदिवासी विकास महामंडळाच्या मनोर येथील उप प्रादेशिक कार्यालयात जाऊन याविषयी जाब विचारला. त्यावेळी येथील उपव्यवस्थापक सागर कोती यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र जर दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात भाताचे पैसे जमा झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने कुणबीसेने कडून देण्यात आला आहे.

यावेळी कुणबी सेनेचे पालघर तालुका सरचिटणीस दिपेश पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील देवेन पाटील,पुंडलिक पाटील, मोहन पावडे, जयवंत पाटील, सतीश भावर, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील,  माणिक पाटील, दिलीप शेलार,विनोद घरत, श्रीमती करुणा कमलाकर सातवी, निकित सातवी,ओमकार भोईर मनीष पाटील यांच्यासह इतर कुणबी सेना पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

हे पण वाचा :-

former protestpalghar