गडचिरोली जिल्हयात उद्यापासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढणार, प्रतिबंधित बाबींना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

  • कोरोनाला रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य अपेक्षित: जिल्हाधिकारी दीपक सिंगला
  • नवीन नियमावली आणि उपाययोजना जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात पुन्हा मोठया प्रमाणात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नवीन आदेश काढून यापूर्वी केलेल्या प्रतिबंधित बाबींना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच कोरोना रूग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बाधित रुग्णांशी संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. 

पहिल्या ७२ तासाच्या आत किमान ८० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.  मिशन बिगीन अगेन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कंटेनमेंट झोन वगळून) जमावबंदी व टाळेबंदीसंदर्भात नियमावली आणि उपाययोजना संदर्भात  जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी नवीन आदेश दिनांक १ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत लागू केले आहे. जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी प्रशासनाला मदत करणे, सहकार्य करणे अपेक्षित आहे. सद्या जिल्हयात दैनंदिन स्वरूपात कोरोना बाधित जास्त वाढत आहेत. हे रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील लोकांनी आपणहून तपासणीसाठी सहकार्य करून, आरोग्य विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांनी कोविड-१९ साथरोग संदर्भाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणेसंदर्भात संबंधित क्षेत्राचे तहसिलदार यांना आवश्यक कार्यवाही करणेबाबत सूचना केलेल्या आहेत. रात्रौ ८ ते सकाळी ७ पर्यंत ५ व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर बाबीचे उल्लंघन केल्यास प्रति माणशी रु. १०००/- दंड महसूल किंवा पोलीस किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत वसूल केले जाणार आहेत.  जिल्ह्यातील सर्व प्रकारचे पार्क, गार्डन इत्यादी १ एप्रिल पासून ते पुढील आदेशापर्यंत रात्रौ ८ ते सकाळी ७ पर्यंत पाच (५) व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सदर बाबीचे उल्लंघन केल्यास प्रति माणशी रु. १०००/- दंड महसूल किंवा पोलीस किंवा स्था.स्व.संस्था वसूल करणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी तोंडावर विना मास्क किंवा विना रुमाल आढळून आल्यास त्याच्यावर दंडनीय कारवाई होणार आहे.  विनामास्क आढळलेल्या प्रति नागरिकाला रु. ५००/- दंड आकारण्यात येणार तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास रु. १०००/- प्रति माणशी दंड राहणार आहे.  सर्व चित्रपटगृहे, खरेदी संकुले, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे, सभागृह, रेस्टारेंट यासारखे तत्सम सर्व ठिकाणे रात्रौ ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. तथापि रेस्टारेंट मधून होम डिलीव्हरी सुविधा उपलब्ध करता येईल. सदर बाबीचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना, दुकान हे राज्यात कोविड-१९ साथरोग म्हणून जोपर्यंत घोषित असेल तोपर्यंत सील करण्यात येणार आहे. विवाहासंबंधीचे कार्यक्रमांना कमाल पन्नास (५०) लोकांच्या मर्यादेत परवानगी असेल. अंत्यसंस्काराच्या बाबतीत वीस (२०) पेक्षा जास्त लोकांच्या जमावास मनाई आहे. सदर बाबीसंदर्भात आवश्यक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियंत्रित पद्धतीने सुरु राहणार आहे. कोविड-१९ साथरोगसंदर्भाने सामाजिक अंतराचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून संबंधित आगार व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी यांनी प्रति माणशी रु.५००/- एवढा दंड वसूल करावा अशा सूचना देणेत आल्या आहेत.

शासकीय विभागात १०० टक्के कर्मचारी तर खाजगी आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू ठेवता येणार : शासकीय विभागातील विभाग प्रमुखांना त्यांचे विभागातील १०० टक्के कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य करावे करणे बाबत आदेश देणेत आले आहेत. तर खाजगी आस्थापना ह्या ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु ठेवण्याची मुभा असणार आहे.  सर्व सार्वजनिक स्थळी  व कामाच्या  ठिकाणी चेह-यावर मास्क, रुमाल वापरणे बंधनकारक आहे. सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा नियम पाळणे अनिवार्य आहे.

Gadchiroli Corona