पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज- डॉ. संजीव कुमार.

  • 2 लाख 6 हजार 454 मतदार बजावणार हक्क.
  • 322 मतदान केंद्रावर 1288 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
  • थर्मल स्क्रीनिंग नंतरच मतदान.
  • कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता.

नागपूर,दि.30 नोव्हेंबर: महाराष्ट्र विधान परिषेदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी उद्या मंगळवार दिनांक 1 डिसेंबर रोजी विभागातील 322 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागातील प्रशासन सज्ज आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागात एकुणा 1288 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना मतदानापूर्वी थर्मल स्क्रीनिंग तसेच मास्कचा वापर करुनच आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत मतपत्रिका तसेच आवश्यक साहित्यांचे वाटप येथील सेंट उर्सुला हायस्कुल येथून करण्यात आले. मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात आवश्यक खबरदारी घेवून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी व मॉयक्रो ऑब्झरर्व्हर यांना केले.

निवडणूक रिंगणात 19 उमेदवार नशिब आजमावणार आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदार असून नागपूर जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 809 मतदार असून यामध्ये 56 हजार 584 पुरुष तर 46 हजार 195 स्त्री पदवीधर मतदारांचा समावेश आहे. तसेच 30-इतर पदवीधर आपला मतदाराचा हक्क बजावणार आहे.

नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत. अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लीक पार्टी ऑफ इंडीया), इंजीनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष), अमीत मेश्राम(अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोघें (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष), डॉ.प्रकाश रामटेके (अपक्ष), बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष),ॲड .मोहम्मद शाकीर अ.गफफार (अपक्ष), सिए . राजेद्र भुतडा प्रा.डॉ.विनोद राऊत (अपक्ष), ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल , शरद जीवतोडे (अपक्ष) , प्रा.संगीता बढे(अपक्ष), इंजीनियर संजय नासरे(अपक्ष), या उमेदवारामध्ये लढत होणार आहे.

कोविड-19 च्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर थर्मल स्कनिंगची व्यवस्था करण्यात आली असून मतदान केंद्रावर सॅनिटायझर, मास्क, ग्लोजची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना सदृश्य व्यक्ती आढल्यास कोरोना संसर्ग होऊ नये, याबाबतची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोरोना बाधित मतदारास शेवटच्या तासांत मतदान करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संदर्भात मतदान केंद्रावर मास्क, रबरी हातमोजे, फेसशिल्ड, 15 पीपीई किट, मेडिसिन किट यामध्ये पॅरॉसिटीमल यासह आवश्यक सर्व औषधांचा समावेश राहणार आहेत. थर्मल गन, हँण्ड सॅनिटॉयझर, साबण, सोडिअम हायपोक्लोरॉईड, आदींसह 15 आवश्यक साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविणार आहे.

विभागात दोन लक्ष 6 हजार 454 मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 2 हजार 809 मतदार हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर पदवीधर निवडणुकीत सहा जिल्ह्यात 322 केंद्रांवर मतदान होणार आहे. वर्धा जिल्ह्यात 23 हजार 68, भंडारा जिल्ह्यात 18 हजार 434, गोंदिया 16 हजार 934, गडचिरोली 12 हजार 448, चंद्रपूर 32 हजार 761 मतदारांचा समावेश आहे. कोवीड-19 संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 164, भंडारा जिल्ह्यांमध्ये 31, गोंदिया जिल्ह्यामध्ये 21, वर्धा जिल्ह्यामध्ये 35, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 50, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 21 असे एकूण 322 मतदान केंद्र असतील.