दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालणार्‍या वाशीमच्या जवानाचा दिल्लीत सन्मान.

ठार झालेले आतंकवादी 'अल बदर' या जहाल आतंकवादी गटाचे होते.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशीम 31 जुलै :-  वाशीम जिल्ह्यातील कबड्डीपटूंचे गाव म्हणून परिचित असलेल्या कळंबा महाली येथील शेतकरीपुत्र तथा केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले जवान ज्ञानदेव देवराव महाले यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यां सोबत झालेल्या चकमकीत दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांना वीरता पदकाने नुकतच सन्मानित करण्यात आल आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाची अठरावी बटालियन आहे. कुलगामच्या पोलीस अधीक्षकांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला एक ठिकाणी काही आतंकवादी लपून बसले असल्याची माहिती दिली होती. त्यावरून या बटालियनच्या जवानांनी तिथला परिसर घेरून दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. या कारवाईत वाशिम येथील जवान ज्ञानदेव देवराव महाले हे सुद्धा सहभागी होते. ठार झालेले आतंकवादी ‘अल बदर’ या जहाल आतंकवादी गटाचे होते. या धाडसी कारवाईबद्दल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्ञानदेव महाले यांना राष्ट्रपती वीरता पदक जाहीर केले होते. त्यानुसार नवी दिल्ली येथील वसंत शौर्य ऑफिसर इन्स्टिट्यूट येथे केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या डायरेक्टर जनरल यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात ज्ञानदेव महाले यांना विरता पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.कळंबा महाली सारख्या छोट्याशा गावातील भूमीपुत्राने मिळवलेलं हे शौर्यपदक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

हे देखील वाचा :-