हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अंकिता पिसुड्डे ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आपल्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतून काढलेले पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले होते.

वर्धा, दि. १० फेब्रुवारी : राज्यात खळबळ उडालेल्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड  प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते.

विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच (10 फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आले.

शासनाने लोक आग्रहापुढे झुकून सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे घोषित केले. विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम, अॅड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार, अवंती सोने आणि सुदीप मेश्राम यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा : 

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बालविवाह रोखल्याने मुलाकडील वऱ्हाडी विवाह न करताच परतले रिकामे हाताने…

 

 

lead news