शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणबी सेनेचे 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर दि.९ जून : अस्तित्वाच्या लढ्यासाठी सिध्द व्हा..या कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिलेल्या हाकेला साथ देत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पालघर तालुका कुणबी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित केले आहे. पालघर तहसील कार्यालयासमोर १३ जून रोजी हे आंदोलन होणार आहे. कुणबी सेनेने शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांत निर्णायक लढा उभा करण्याचे ठरविले असून त्यासाठी १ जून २०२२ ते ३० जून २०२२ पर्यंत राज्यातील सर्व तहसिल कार्यालयासमोर “धरणे आंदोलन” करण्याचे निश्चित केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या बावीस वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने व इतर माध्यमातून लढा देणारी कुणबी सेना आता अधिकच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. कोकण आणि राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील भात (धान) शेती व्यवसाय अखेरची घटका मोजीत आहे. त्यातच निसर्गाचा ढासळलेला समतोल व शासनाचे चुकीचे धोरण तसेच खते, बी-बियाणे, अवजारे व मजुरीचे वाढते दर यामुळे खर्च व उत्पन्न याचा मेळ बसत
नाही. अनेक वर्षे परवडत नसलेली शेती केल्याने केवळ निसर्गावर अवलंबून कोरडवाहू शेतकरी कर्जाच्या खाईत डुबून उध्वस्त होत आहे.

त्यामुळे भात शेतीची लागवड रोजगार हमीतून करुन द्या. शेतकऱ्यांना डिझेल ५०% अनुदानात देण्यात यावे, बी-बीयाणे, खते आणि औषधे तातडीने अनुदानातून उपलब्ध करुन द्यावीत. पीक विमा कंपन्यामार्फत होत असलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना काहीही लाभ मिळत नाही, त्यामुळे शासनाने पीक विमा कंपन्यांची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

केंद्र व राज्य शासनांकडून भात खरेदीवर शेतकऱ्यांना देण्यांत येणारा बोनस तातडीने द्यावा तसेच भात
खरेदी केंद्राची संख्या वाढवून भातासोबत गवत-पावळी यांची आधारभुत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने खरेदी करावी. पालघर जिल्ह्यात शेती आधारीत प्रक्रिया उद्योगांची निर्मिती करण्यात यावी. शासनाच्या ते
विविध विकास प्रकल्पामध्ये संपादन झालेल्या जमिनींचा शेतकऱ्यांना समन्यायी मोबदला मिळावा. वीज वितरण कंपनीकडून कृषी पंपाना देण्यात येणारी अवास्तर बिले मिटर रिडींगनुसार देण्यात यावीत व शेतकऱ्यांचे
थकीत वीज बिल माफ करावे. २०१७ साली केलेल्या कर्ज माफीची प्रत्यक्ष अमंलबजावणी करावी व नियमीत कर्ज भरणाऱ्याचे अनुदान देण्यात यावे. भूमिहीन आणि अल्पभूधारक बिगर आदिवासी शेतकरी कसत असलेले फॉरेस्ट फ्लॉट (वनपट्टे) वनहक्क कायद्यानुसार त्यांच्या नावावर केले जावेत. अशा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मागण्या कुणबी सेनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

हे आंदोलन अतिशय लक्षवेधी होणार असून, यामध्ये शेतकरी – कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे कुणबी सेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
त्यामुळे या आंदोलनाची दखल सरकार दरबारी कशाप्रकारे घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पालघर येथे होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथजी पाटील स्वतः तसेच ज्येष्ठ नेते परशुराम सावंत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. विवेक पाटील, प्रदेश प्रतिनिधी रमेश डोंगरे, पालघर जिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Kunbi senalead news