सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई दि,२२ मार्च  : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत.  तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील भाव एकच आहे. हा समानतेचा भाव भारतात आसेतु हिमाचल पसरला असल्यामुळे देशाची एकात्मता राखण्यात भारतीय भाषांचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या पुनर्निर्माणासाठी (renaissance) तसेच सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी आपल्या भाषांचे समृद्ध असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व केंद्रीय हिंदी निदेशलायातर्फे आयोजित ‘राष्ट्र निर्माण कार्यात भारतीय भाषांची भूमिका’ या विषयावरील ३-दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (२२ मार्च) महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झाले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

चर्चासत्राला  राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे अध्यक्ष भूषण पटवर्धन, ‘राष्ट्रधर्म’चे संपादक ओमप्रकाश पांडेय, श्री लाल बहादूर शास्त्रीय केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु मुरली मनोहर पाठक, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु उज्वला चक्रदेव तसेच चर्चासत्राचे निमंत्रक व संस्कृत विभागप्रमुख डॉ जितेंद्र कुमार तिवारी यांसह निमंत्रित, शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

तेराशे वर्षांपूर्वी केरळच्या कलाडी येथून भारत भ्रमण सुरु करून बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, द्वारका, कांची कामकोटी असा हजारो मैल प्रवास करून आद्य शंकराचार्यांनी धर्मपीठे स्थापन केली.  त्यावेळी लोकांशी संवाद साधताना त्यांना भाषेची अडचण आली नाही कारण भाषेच्या पलीकडे या देशातील भाव सर्वत्र सारखा आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

सर्व भाषा एकमेकांना जोडतात. भारतीय भाषा मणी आहेत तर संस्कृत किंवा आजच्या युगात हिंदी ही त्यांना जोडणारे  सूत्र  आहे असे राज्यपालांनी सांगितले.  विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेला विसरू नये आणि सोबतच सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृतला देखील विसरु नये. मातृभाषेचा अभिमान बाळगावा व त्याद्वारे देशाला जगद्गुरू बनवावे असे राज्यपालांनी सांगितले.

हे देखील वाचा ,

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 14 लाखांचा प्रतिष्ठित संशोधन प्रकल्प गोंडवाना विद्यापीठाला मंजूर

रोजगार हमी योजनेची थकीत मजुरी मिळावी यासाठी श्रमजीवी संघटनेचे अनोखे आंदोलन…

Clead stori narendra modi bhagatsingkoshyari M Uddhav Thakarey