संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये

राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई प्रतिनिधी, दि. ८ ऑगस्ट : शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांची ईडीची कोठडी आज संपत असल्याने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. याप्रकरणी राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची देखील इडिने चौकशी केली होती.

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत असलेल्या संजय राऊत यांची कोठडी संपत असल्याने राऊत यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे राऊत यांना ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीनासाठी अर्ज करता येणार आहे.

संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात

संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आल्यामुळे आजपासून राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती मिळाली आहे.

मोठी बातमी: एकनाथ शिंदे सरकारचा उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार..