धक्कादायक! पोलीस जावयाकडून सासऱ्याची हत्या; मारहाणीत पत्नी गंभीर

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील घटना.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

नाशिक, दि. ११ एप्रिल : पोलिस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने घरगुती वादातून पत्नी, सासरे आणि सासू यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केले. या तिघांपैकी सासरे निवृत्ती सांगळे यांचे उपचारादरम्यान निधन झाले. पत्नी आणि सासू यांच्यावर उपचार सुरू असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे.

हल्ला करणारा मनमाड पोलिस दलातील सूरज देविदास उगलमुगले हा फरार झाला आहे. याबाबत त्याची आई अलका उगलमुगले हिस अटक करण्यात आली आहे. पोलिसाला साथ देणाऱ्या इतर साथीदारांना देखील अटक करावी, अशी मागणी नातलग आणि ग्रामस्थांनी केली, संतप्त नातलगांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

यावेळी निफाडचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आणि मनमाड येथे दंगा नियंत्रण विभागात कार्यरत असलेला सूरज देविदास उगलमुगले याचे आणि पत्नी पूजा यांच्यात घरगुती वाद झाला होता.

त्यामुळे पूजा माहेरी सिन्नर तालुक्यातील दोडी येथे वडील निवृत्ती दामोदर सांगळे यांच्याकडे गेली होती, शुक्रवार दि. ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास सुरज याने मित्रांसोबत दोडी बुद्रुक येथे जाऊन पत्नी आणि सासरच्या लोकांसोबत वाद घातला, सूरजने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने सासरे निवृत्ती दामोधर सांगळे वय ४८, सासू शिला निवृत्ती सांगळे आणि पत्नी पूजा उगलमुगले यांच्यावर हल्ला केला. यात तिन्ही व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यावेळी ग्रामस्थांना घटना माहिती होईपर्यंत सूरजने या ठिकाणाहून पळ काढला.

ग्रामस्थांनी जखमींना नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांनी आणि नातलगांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावणार नाही, अशी भूमिका घेतली, वेळेवर दिलेल्या माहितीची दखल न घेतल्याने उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे केली आहे.

हे देखील वाचा : 

महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

पुष्कर कुंभमेळा करीता जाण्यासाठी एसटी बसेसचे वेळापत्रक जाहीर

 

crimelead newsnashik